कुडाळ तालुक्यात सप्तरंगी झाडांची मोठ्या प्रमाणात तस्करी

वनविभागातील कर्मचारी सहभागी ?
Edited by: भरत केसरकर
Published on: October 12, 2023 15:39 PM
views 557  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यामध्ये सप्तरंगी झाडांची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. या सप्तरंगी झाडाने  भरलेला आज एक ट्रक वनविभागाने पकडला आहे. या तस्करी मध्ये ग्रामीण भागातील काही लोक आणि कुडाळ तालुक्यातील वनविभागातील अधिकारी यांच्या संगनमताने ही तस्करी होत असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.

कुडाळ वनविभागाच्या हद्दीतील भागातून भयंकर प्रमाणात या सप्तरंगी झाडाची तस्करी होत असल्याची यापूर्वी चर्चा होती. या तस्करीकडे वन विभागाने पुरते डोळे झाक केले होते. या झाडाच्या स्मगलिंग मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बडे नेते असल्याची चर्चाही चालू आहे.

या तस्करीमध्ये ग्रामीण भागातील आदिवासी समाज असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये हा आदिवासी समाज गुंतलेला असून चोरी करून हा समाज एजंटाना माल देतो.नंतर हे एजंट वनविभागतील अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने ही वस्तू बाहेर विकतात.सप्तरंगी ही वनस्पती अतिशय मौल्यवान असून बाजारात त्याला अतिशय मोठ्या प्रमाणात व चढ्या भावाने मागणी आहे.ही वनस्पती वनौषधी असून दुर्मिळ आजारावर त्याचा उपयोग केला जातो.या वनस्पतीचे मोठ्या प्रमाणात जतन केले जाते.या तस्करीमध्ये वनविभागाचा हात आहे का? अशी पण चर्चा सुरू आहे.दरम्यान कुडाळात गाडी पकडून कारवाई सुरू करण्यात येत असताना मोठ्याप्रमाणात दबाव तंत्राचा वापर होत असल्याचे समोर येत आहे.