
बांदा : मडूरा ( रेडकरवाडी ) येथील निराधार व गेल्या दोन वर्षापासून धनुर्वात आजाराने अंथरुणाला खिळलेल्या तोरस्कर या तरुणाला सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते दर महिन्याला दानशूरांना घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचतात. आज सावंतवाडी येथील रासाई कला क्रीडा मंडळ लाखे वस्तीतील रोहित लाखे या युवकामार्फत दिवाळी सणानिमित्त जीवनावश्यक वस्तू व नवीन कपड्यांची भेट तोरस्कर कुटुंबांना दिली.
आठ दिवसांपूर्वीच लाखे वस्तीतील युवकांनी पणदूर येथील सविता आश्रमला अशाच प्रकारे जीवनावश्यक वस्तू दिल्या होत्या. प्रत्येकांच्या अडी अडचणीला धावणार हे लाखे वस्तीतील युवक आज इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांना त्यांचा नेहमीच सहभाग असतो. तसेच सामाजिक बांधिलकीचे प्राध्यापक सतीश बागवे यांनी त्या कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तू व फराळ भेट दिली.
सामाजिक बांधिलकीचे संजय पेडणेकर व रवी जाधव अशा अनेक आजारी व निराधार कुटुंबापर्यंत दानशुरांना पोहोचवण्याचे सेवाभावी काम करतात असतात. या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट आहे. आपणही या युवकाला व त्याच्या हतबल, मुकबधीर पत्नीला यथाशक्ती सहाय्य करून त्यांचे संकटात असलेले जीवन सुखमय करावं, असे सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून नम्रपणे आवाहन करण्यात येत आहे.