'लाडकी बहिण'साठी पोस्टात काढा 'शून्य' रुपयात खातं !

Edited by: देवयानी वरसकर
Published on: July 06, 2024 07:42 AM
views 626  views

सिंधुदुर्गनगरी :  महाराष्ट्र शासनाद्वारे घोषित करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत २१ ते ६५ वर्ष वयोगटातील महिलांच्या खात्यामध्ये दरमहा १५०० रुपये इतकी रक्कम जमा केली जाणार आहे. यासाठी डाक विभागामार्फत पोस्ट ऑफिस सेविंग बँक खाते हे शून्य रुपयांमध्ये काढून देण्यात येत आहे. तसेच या खात्याला आधार क्रमांक संलग्न करून त्यामध्ये महिला या योजनेचे पैसे जमा करून घेऊ शकतात. 

या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थी महिलांचे आधार संलग्न खाते असणे आवश्यक आहे. पोस्ट ऑफिसमध्ये सदर योजनेअंतर्गत महिलांचे कोणतेही पैसे न भरता (शून्य रकमेने) , आधार  संलग्न सेविंग खाते उघडता येणार आहे. यासाठी महिलांनी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये केवळ आपले आधार कार्ड व फोटो घेऊन जाणे आवश्यक आहे. तसेच महिला सदर योजनेच्या लाभासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे देखील ‘शून्य’ बॅलन्स’ खाते काढू शकतात. महिलांना पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन किंवा आपल्या गावातील/ शहरातील पोस्टमन/ शाखा डाकपाल  यांचेशी संपर्क साधून आपले खाते उघडता येणार आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पोस्ट ऑफिसेस सदर योजनेसाठी अर्ज करू इच्छीणाऱ्या महिलांचे पोस्ट ऑफिस सेविंग खाते उघडण्यासाठी सेवा देण्यास सज्ज आहे. तसेच ज्या महिलांचे पोस्ट ऑफिसमध्ये आधीच खाते आहे परंतू खात्यास आधार क्रमांक संलग्न केलेला नाही. त्यांनी या योजनेचे पैसे जमा होण्यासाठी त्वरित नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपला आधार क्रमांक खात्यास संलग्न करून घ्यावा व तो खाते क्रमांक सदर योजनेसाठी अर्ज करतांना देता येईल. तरी  ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’  योजनेसाठी पात्र असण्याऱ्या सर्व महिलांनी त्वरीत आपल्या जवळच्या पोस्टात आधार सलग्न सेविंग खाते अथवा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते काढून घ्यावे असे आवाहन सिंधुदुर्ग विभागाचे डाक अधीक्षक, मयुरेश कोले यांनी केले आहे. अधिक माहितीकरिता नजीकच्या डाकघराशी संपर्क साधावा.