
सावंतवाडी : वेंगुर्ला शहरात ५० खाटांचे नूतन उपजिल्हा रुग्णालय सुरू होऊन दोन वर्षे उलटून गेली तरी यात सुविधांची मात्र वानवा पाहायला मिळत आहे. या सर्व प्रकाराला निष्क्रिय आमदार दीपक केसरकर जबाबदार आहेत तुम्ही विकास केला म्हणून सांगता तर हे काय असा सवाल यशवंत परब यांनी केला आहे.
प्राथमिक उपचारच रुग्णांना व्यवस्थित मिळत नसल्याने याबाबत सातत्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय. दरम्यान, याठिकाणी येणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना राहण्यासाठी क्वाटर्स नसल्याने व सुविधांच्या अभावी ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने हे वैद्यकीय अधिकारी रुग्णालय सोडून जाण्याच्या मार्गावर असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असल्याच परब यांनी सांगितलं.
वेंगुर्ला तालुक्यासाठी असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाचे २ वर्षांपूर्वी उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर झाले. तर या सुसज्ज अशा उपजिल्हा रुग्णालयाचे २५ जून २०२१ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या थाटात उदघाटन झाले होते. मात्र, या रुग्णालयात सर्व मशीन असून सुद्धा त्याला ऑपरेटर नसल्याने त्या धूळ खात पडून आहेत. तर सध्या रुग्णांना दिले जाणारे काही प्राथमिक उपचारच व्यवस्थित मिळत नसल्याने नागरिकांकडून वारंवार संताप व्यक्त होत आहे. या रुगणालात एकूण ८ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा मंजूर असून याठिकाणी ६ वैद्यकीय अधिकारी देण्यात आले होते.
या डॉक्टरांना राहण्यासाठी क्वाटर्स नसल्याने व सुविधां अभावी नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने यातील ३ वैद्यकीय अधिकारी सोडून गेले आहेत तर उर्वरित ३ सोडून जाण्याच्या मार्गावर आहेत. याठिकाणी सुसज्ज असे एक्सरे मशीन असून सुद्धा येथील टेक्निशियनची बदली झाल्याने व नवीन टेक्निशियन दिला नसल्याने हे एक्सरे मशीन एप्रिल पासून बंद आहे. यामुळे रुग्णांना खासगी ठिकाणी एक्सरे काढावे लागत असून आर्थिक भुर्दंड बसत आहे. तर रुग्णालयात २ व्हेंटिलेटर असून याला सुद्धा टेक्निशियन डॉक्टर नसल्याने या बंद अवस्थेत आहेत.
या रुग्णालयात औषधसाठा आहे. दैनंदिन लागणाऱ्या प्रेशर च्या गोळ्या संपल्याने व या गोळ्या मेडिकल मध्ये महाग मिळत असल्याने गरीब रुणांना आर्थिक भुर्दंड बसत असून इतर खासगी ठिकाणी जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत.या रुग्णालयात मुख्य म्हणजे भुलतज्ञ डॉक्टर नसल्याने गर्भवती रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. याठिकाणी ९ महिने उपचार घेऊन गर्भवती महिला नॉर्मल किंवा सिजर डिलिव्हरी साठी बाहेर जात आहेत. तर गर्भवती महिलांची या रुग्णालयात डिलिव्हरी करण्यास सुरक्षित नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या रुग्णालयात एकूण सात क्लास-४ कर्मचाऱ्यांच्या जागा असून सध्या फक्त चार शिपाई कार्यरत आहेत. त्यामुळे या रुग्णालयाच्या वॉचमन वर केसपेपर काढण्याची वेळ आली आहे. तर रुग्णालयाच्या कार्यालयामध्ये फक्त कनिष्ठ लिपिक कार्यरत असून सहाय्यक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, शिपाई ही पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीला आमदार दीपक केसरकर हे जबाबदार असून त्यांच्या निष्क्रियता दिसून आली आहे त्यामुळे त्यांना आता घरी बसवा ते या ठिकाणी कोणताही विकास करू शकत नाही अशी टीका यशवंत परब यांनी केली.