
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सुंदर वनश्रीने नटलेल्या कुणकेरी गावाचे वैशिष्ट म्हणजे येथील होळी उत्सव. गगनचुंबी असा हा प्रसिद्ध हुडोत्सव ३० मार्चला भाविकांच्या मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या हुडोत्सवाने कुणकेरी गावाचा नावलौकिक दाहीदिशांना पसरला आहे. फाल्गुनी पौर्णिमेपासून कुणकेरीचा शिमगोत्सव सुरु होतो. सात दिवस हा उत्सव चालतो. फाल्गुनी पौर्णिमेच्या चांदणी रात्रीत सर्व देवालयाकडे ताडामाडाच्या होळ्या घातल्या जातात. यावेळी श्री देव लिंग मंदिराकडे आंब्यांची होळी घातली जाते. तर श्री देवीच्या उत्सवातील प्रमुख होळी चव्हाटा अर्थात हुड्याजवळ सर्व ग्रामस्थांच्या सहाकार्याने ढोल-ताशांच्या गजरात रोंबाट घालत घातली जाते. याच दिवशी बाराच्या घटाची स्थापना करून मानकऱ्यांच्या मानाप्रमाणे बारा ढोल, ताशे, सनईसह चव्हाटा येथे आणले जातात. दुसऱ्या दिवशी सगळे ढोल श्री देवी भावईचे घर व गावडे यांचे देवघर येथे आणले जाते. त्याच दिवशी १५० दलित बांधवांना मानसन्मानासह भोजन प्रसाद दिला जातो.
सायंकाळी सर्व ढोल पुन्हा चव्हाटा येथे येऊन सर्व मानकरी आपआपल्या मानाप्रमाणे आपल्या मांडावर घेऊन जातात व त्यानंतर प्रत्येक वाडीतील प्रत्येक घराकडे हा ढोल जातो. हा कार्यक्रम पौर्णिमेच्या चौथ्या दिवसापर्यंत सुरु असतो. चौथ्या दिवशी संध्याकाळी चव्हाटयावर हळदीचा कार्यक्रम होतो. पाचव्या दिवशी खेळगडयांचा कार्यक्रम व दांड्याचे रोंबाट हा वैशिष्टपूर्ण कार्यक्रम मानाप्रमाणे व रीतीरिवाजाप्रमाणे साजरा केला जातो. या दिवशी गावातील युवा मंडळी राधा व शबयसाठी वेगवेगळी सोंगे धारण करतात व हक्काने शबय मागण्यासाठी फिरतात. सहावा दिवस शिमगोत्सवातील अत्यंत महत्वाचा दिवस. या दिवशी सकाळी ढोल चव्हाटा येथे आल्यावर मानाप्रमाणे सर्व ढोल मानकरी आपापल्या मांडावर घेऊन जातात. दुपारी तीन वाजता श्री देवी भावईच्या घराकडून देवाचे रोंबाट सुटण्यापूर्वी मानकऱ्यांचा ढोल भावाईच्या घराकडे येतो. तसेच यावेळी पाळणेकोंडकर, सावंत यांचे रोंबाट श्री भावईच्या घरी आल्यानंतर तीन अवसरी देव त्या ठिकाणी उभे राहतात आणि त्यानंतर मानकरी, वाघरुपी सोंगवाले, घोडेवाले मानाच्या निशाण काठीसह रोंबाट वाजत-गाजत, ओरडत सुटते. सुटलेले रोंबाट प्रथम चावडेश्वर देवाकडे जाते व त्यावेळी भवानी मातेचे मानकरी सावंत यांचे रोंबाट देवीच्या रोंबटामध्ये मिसळते. त्यानंतर रोंबटातील मुख्य निशाण पिंपळवाडीकडील पिंपळाकडे थांबते. तोपर्यंत मुख्य रोंबाट पिंपळाच्या अलीकडे थांबते. यावेळी काशेलकर, सावंत, पळसाच्या दळ्यातील सावंत, चौकेकर, कोंडुसकर, खानोलकर, सावंत यांची रोंबाट येवून थांबलेली असतात. पिंपळकर, सावंत हे मुख्य निशाण काठीची पिंपळाकडे येवून पूजा करतात व गुलाल उधळतात. याचवेळी पिंपळाच्या अलीकडे थांबलेले रोंबाटकरी मुख्य रोंबाटात सामील होवून गुलाल उधळतात. हे सर्व रोंबाट एकत्र येऊन आंबेगावच्या श्री देव क्षेत्रपालाचे दर्शन घेण्यासाठी अवसार काठीसह सीमेपर्यंत धावत जातात. श्रींचे दर्शन घेतल्यावर भवानी देवीचे दर्शन घेऊन रोंबाट पुन्हा चव्हाटा येथे येते. त्यानंतर संध्याकाळी मानाप्रमाणे ढोल घेतल्यावर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास होळी व हुड्यावर धूळ मारण्यासाठी जातात. त्या ठिकाणी परंपरेनुसार होळी व हुडा याचेवर धूळ मारून धुळवड साजरी केली जाते. त्यानंतर हुड्याच्या समोर तिन्ही देवांच्या अवसारात संचार येऊन ग्रामस्थांना पुढील विधींना शुभाशिर्वाद दिला जातो. त्यानंतर हुड्याच्या समोर तिन्ही देवांच्या अवसारात संचार येऊन ग्रामस्थांना पुढील विधींना शुभाशिर्वाद दिला जातो. त्यानंतर रात्री पेटत्या शेणी मारण्याचा कार्यक्रम होतो. हा कार्यक्रम पाहण्यासाठी जवळपासच्या गावातील भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित राहतात. शेणी जाळून झाल्यावर श्रींचे रोंबाट पुन्हा चव्हाट्यावर येऊन कवळे जाळण्याचा कार्यक्रम केला जातो. यामध्ये कवळे जाळीत असताना हुडा आणि मुख्य होळी यांच्या सभोवती वाजत-गाजत धावत फेऱ्या मारतात. मात्र, वैशिष्ट्य असे की पेटत्या आगीतून धावत असताना कोणालाही कसल्याही प्रकारची इजा पोहोचत नाही.
सातव्या दिवशी अर्थात हुडोत्सवाच्या दिवशी सहाव्या दिवसाप्रमाणे मुख्य रोंबाट आंबेगावच्या सीमेपर्यंत जाते. तत्पूर्वीच आपल्या बहिणीच्या या हुडोत्सवासाठी निशाणकाठी मानकऱ्यांसहित आंबेगावचा श्री देव क्षेत्रपाल सीमेवर येऊन थांबतो. यावेळी बहिण श्री देवी भावई आपल्या मोठ्या भावाच्या भेटीसाठी उत्सुक असल्याने अवसारासहित तिथे जावून भावाची भेट घेते व योग्य मानपान करून आंबेगावचे रोंबाट मुख्य रोंबाटात सामील होते. याचवेळी कोलगाव गावचा धाकटा भावू श्री देव कलेश्वर आपल्या सीमेपर्यंत आलेला असतो. यावेळी धाकट्या भावाच्या स्वागतासाठी श्री देवीचे अवसार व रोंबाट जाऊन मानसन्मानासह कोलगावचे रोंबाट भावई मंदिराकडे आणले जाते. यावेळी सकाळपासून देवस्थानचे मानकरी परब यांच्या घरी अर्थात श्री देवी भावईच्या घराकडे श्रींची ओटी भरणे, नवस फेडणे हा कार्यक्रम सायंकाळीपर्यंत चालू असतो. श्रींची पालखी, निशाण काठीसह श्री देवी भावईच्या मंदिराकडे वाजत-गाजत आणली जाते. ब्राम्हण विधी, पूजाअर्चा आटोपल्यावर तीनही अवसार प्रसाद-कौल देऊन पालखी व रोंबाटासह हुड्याजवळ येतात. हुड्याजवळ आल्यावर घोडेमोडणी, वाघाची शिकार हा आगळावेगळा कार्यक्रम होतो.
श्रींची पालखी हुड्याजवळ ठेवून तिन्ही संचारी अवसार गगनचुंबी १०० फुटी असणाऱ्या हुड्यावर चढण्यासाठी सज्ज होतात. गाऱ्हाणे झाल्यावर संचारी अवसार हुड्यावर चढतात. हा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो भाविक उपस्थित असतात. यावेळी १०० फुटी उंच हुड्यावर चढलेला संचारी अवसारांवर भाविकांकडून दगड मारण्याचा कार्यक्रम होतो. हुड्यावर चढलेल्या संचारी अवसारावर ज्याचा दगड बसेल त्याचे भविष्य उज्वल होते, अशी आख्यायिका आजही रूढ आहे. असा हा नेत्रदीपक हुडोत्सव पाहण्यासठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ते अगदी गोवा, कर्नाटक राज्यातून हजारो भाविक कुणकेरी गावात दाखल होतात.