
सावंतवाडी : कुणकेरी भवानीवाडी येथील सावंत भोसले कुलस्वामिनी श्री देवी भवानी चरणी श्री जगन्नाथ संगीत विद्यालय आंदुर्लेचा भजनारंग आणि ढोलकी भुलली मृदुंग सवे घेऊनी तबल्याला हा संगीतमय कार्यक्रम मंगळवार १४ मे २०१४ रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आंदुर्ले येथील श्री जगन्नाय संगीत विद्यालयाचे संचालक पखवाज अलंकार महेश विठ्ठल सावंत आणि त्यांच्या ग्रुपने हा संगीतमय कार्यक्रम सादर करून उपस्थित रसिकांची मने जिंकली.
पखवाज अलंकार महेश सावंत यांच्या अप्रतिम पखवाज वादनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्यांना साथ देणारे पखवाज विशारद दत्तप्रसाद खडपकर, पखवाज विशारद सचिन कातवणकर, गायक तसेच हार्मोनियम वादक अमित उमळकर, संगीत अलंकार प्रफुल्ल रेवंडकर, तबलावादक विनायक जोशी, गायिका विद्या कवठणकर, युवा गायिका . कु. कशिष खडपकर, गायक विश्राम गोवेकर यांनीही अप्रतिम सादरीकरण केले.विशेष म्हणजे पखवाज अलंकार महेश सावंत यांच्याकडून पखवाज वादनाचे प्रशिक्षण घेणाऱ्या त्यांच्या
३६ विद्यार्थ्यांच्या सुश्राव्य पखवाज वादनाचे अतिशय सुंदर असे सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळविली.यावेळी सावंत-भोसले कुलस्वामिनी भवानीवाडी परिवारातर्फे पखवाज अलंकार महेश सावंत यांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन यथोचित गौरव करण्यात आला. तसेच त्यांचे सहकारी गायक व वादकांनाही शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या पखवाज वादनात सहभागी झालेल्या सर्व वादकांना श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी महेश सावंत यांनी आपली कुलदेवता श्री देवी भवानी आईच्या चरणी माझी संगीत सेवा सादर करता आली याचा आनंद व समाधान प्राप्त झाल्याचे सांगुन इथे मिळालेल्या यथोचित मानसन्मानाने संपूर्ण टिम आनंदाने गहिवरून गेल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे निवेदन सौ. निता नितीन सावंत- भोसले यांनी केले.