
सावंतवाडी : बाजारपेठेत येणार्या जाणार्या गाड्या आणि पार्किंगला अडथळा होवू नये म्हणून शहरातील व्यापार्यांनी नगरपालिकेला सहकार्य करावे. सत्ता भाजपाची आहे, त्यामुळे यापुढे कोणाला त्रास होणार नाही. मात्र, व्यापार्यांनी आम्हाला सहकार्य करावे. याबाबत लवकरच बैठक घेवून योग्य तो निर्णय घेवू, असे मत सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी व्यापार्यांना केले.
दरम्यान, महिलांची गैरसोय लक्षात घेता नगरपालिकेच्या मागे असलेले स्वच्छतागृह पुन्हा सुरू करण्याबाबत किंवा त्या ठिकाणी नवे स्वच्छता गृह बांधण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. इंदीरा गांधी व्यापारी संकुलाच्या परिसरात बसणार्या व्यापार्यांना शौचालयाची समस्या जाणवत होती. याबाबत पर्याय असलेले बाळकृष्ण कोल्ड्रीक्सच्या मागे असलेल्या शौचालयात सायंकाळी सात वाजता बंद केले जात होते. त्यामुळे व्यापारी आणि विशेषतः महिलांची गैरसोय होत होती. याबाबत व्यापारी कुणाल श्रृंगारे, पुंडलिक दळवी यांनी ॲड. निरवडेकर यांंचे लक्ष वेधले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सहकारी नगरसेवक आनंद नेवगी, सुधीर आडीवरेकर, प्रतिक बांदेकर यांना सोबत घेवून त्यांनी आज स्वच्छता गृहाची पाहणी केली. तसेच कॉम्प्लेक्समध्ये तुटलेल्या फरश्या तात्काळ बसविण्यात याव्यात, अशा सुचना केल्या. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या व्यापार्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. शौचालयाची समस्या त्यांनी बोलून दाखविली. आपण हा प्रश्न सोडविणार आहोत, असे आश्वासन श्री. निरवडेकर यांनी दिले. तर आपण या ठिकाणी केवळ तुमची गैरसोय टाळण्यासाठी आलो आहोत. भाजपाचे सरकार आहे त्यामुळे कोणाला त्रास होणार नाही, असा शब्द त्यांनी दिला. तुम्ही फक्त आम्हाला सहकार्य करा. आम्ही निश्चितच तुम्हाला सहकार्य करु, असा शब्द दिला.










