सावंतवाडीत मराठा हॉस्टेलच्या बाजूला गवताला आग

Edited by: विनायाक गांवस
Published on: January 23, 2026 19:25 PM
views 18  views

सावंतवाडी : शहरातील शिरोडा नाका परिसरात मराठा हॉस्टेलच्या बाजूला असलेल्या गवताला आज दुपारी सुमारे अचानक आग लागली. या घटनेमुळे परिसरात काहीकाळ खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. शिरोडानाका येथील मराठा हॉस्टेललगत असलेल्या गवतामधून आगीचे लोळ दिसताच नागरिकांनी तात्काळ सावंतवाडी नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला याची माहिती दिली. सूचना मिळताच नगरपालिकेचा अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला.

अग्निशमन कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत काही वेळातच आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वेळीच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. नगरसेवक अजय गोंदावळेंनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.