
कुडाळ : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घावनळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघात महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. आज ग्रामदैवत श्री देव रामेश्वर यांच्या चरणी नतमस्तक होऊन, महायुतीच्या प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला. यावेळच्या निवडणुकीत महायुतीने 'तगडे उमेदवार' मैदानात उतरवल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. शिवसेना (शिंदे सेना) पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद घावनळे उमेदवार म्हणून श्री. दीपक नारकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. नारकर यांचा घावनळे आणि परिसरातील गावांमध्ये असलेला दांडगा जनसंपर्क आणि सामान्यांच्या प्रश्नांची असलेली जाण लक्षात घेऊन पक्षाने त्यांना ही संधी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
युतीचे शक्तिप्रदर्शन
यावेळी पंचायत समितीसाठी भाजपच्या उमेदवार अर्चना घावनळकर यांच्यासह शिवसेना आणि भाजप महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. "गावच्या विकासासाठी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी महायुती कटिबद्ध आहे," असा विश्वास यावेळी उमेदवारांनी व्यक्त केला.
दीपक नारकर ( शिवसेना -शिंदे, जि.प. उमेदवार), अर्चना घावनळकर (भाजप, पं. स. उमेदवार) महायुतीचे जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी. प्रचाराच्या या शुभारंभप्रसंगी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. रामेश्वराचा आशीर्वाद घेऊन निघालेली ही प्रचाराची रॅली आता गावागावात पोहोचणार असून, दीपक नारकर यांच्या जनसंपर्काची या निवडणुकीत कसोटी लागणार आहे.










