
कुडाळ : तालुक्यातील चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ, मुंबई संचलित श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे शालेय विद्यार्थ्यांमधील कला-गुणांना वाव देण्यासाठी नाट्य व अभिनय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि. २७ व २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे.
या प्रशिक्षण शिबिराचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये अभिनयाची आवड निर्माण करणे, आत्मविश्वास वाढवणे व रंगमंचीय सादरीकरणाची ओळख करून देणे हे आहे. शिबिरात इयत्ता ४ थी ते ७ वी व ८ वी ते १२ वी अशा दोन गटांत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शिबिरासाठी नाट्य क्षेत्रातील अनुभवी मार्गदर्शक लाभले आहेत. यामध्ये नाट्य लेखक व दिग्दर्शक केदार देसाई (कुडाळ), मुंबई येथील सिने अभिनेते व दिग्दर्शक, तसेच महाराष्ट्र लोकनाट्य व लोकनृत्य शैलीचे अभ्यासक डॉ. अवधूत रामचंद्र भिसे आणि कुडाळ येथील आकाशवाणी सिंधुदुर्गचे निवेदक व अनुभवी रंगकर्मी निलेश जोशी यांचा समावेश आहे.
शिबिरात विद्यार्थ्यांना अभिनयासाठी प्राथमिक व सोप्या युक्त्या, वाचिक, सात्विक, आहार्य व अंगीक अभिनय, रंगमंचावर नाट्य साकारण्याचे विविध प्रकार, मोबाईलवर शॉर्ट फिल्म निर्मिती, स्क्रीनप्ले लेखन तसेच वैयक्तिक अभिनय अधिक प्रभावी व बहुरंगी कसा करावा याचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. मर्यादित जागा उपलब्ध असून प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी ९४२११४७२१९ व ९४२१९१३०६४ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.










