
कुडाळ : ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२५ मध्ये तांत्रिक अडचणींमुळे किंवा अन्य कारणांमुळे आपली पीक नोंदणी (ई-पीक पाहणी) वेळेत केलेली नाही, अशा शेतकऱ्यांसाठी शासनाने 'ऑफलाईन' नोंदणीची विशेष संधी उपलब्ध करून दिली आहे. कुडाळ व मालवण तालुक्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी (महसूल) श्रीमती ऐश्वर्या काळुशे यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने १४ डिसेंबर २०२५ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार, आता गाव पातळीवर विशेष समितीमार्फत ही नोंदणी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
अर्ज सादर करण्याचा कालावधी: १७ डिसेंबर २०२५ ते २४ डिसेंबर २०२५. आपल्या गावातील 'ग्राम महसूल अधिकारी' (तलाठी) यांच्याकडे सादर करावे. २५ डिसेंबर २०२५ ते ७ जानेवारी २०२६ पाहणी साठी असेल. शेतकऱ्यांनी विहित मुदतीत तलाठ्यांकडे अर्ज करून त्याची पोचपावती स्वतःकडे जपून ठेवावी. मंडल अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकाची पाहणी करेल. पाहणीची तारीख व वेळ संबंधित शेतकऱ्याला तसेच शेजारील ४-५ शेतकऱ्यांना लेखी स्वरूपात आगाऊ कळवण्यात येईल. पंचनामा: पाहणीच्या दिवशी प्रत्यक्ष शेतात कोणत्या पिकाची लागवड केली होती, याची खातरजमा करून स्थानिक चौकशी व पंचनामा केला जाईल. ज्या शेतकऱ्यांची पीक नोंदणी 'गाव नमुना नं. १२' वर अद्याप प्रतिबिंबित झालेली नाही, त्यांच्यासाठीच ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.
कुडाळ आणि मालवण तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपली पीक नोंदणी वेळेत पूर्ण करावी, जेणेकरून भविष्यात शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागणार नाही. असे आवाहन उपविभागीय अधिकारी (महसूल) श्रीमती ऐश्वर्या काळुशे यांनी केले आहे.
>










