
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरूळ दुर्गवाड परिसरात बिबट्याने पाळीव जनावरांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये नेरूळचे रहिवासी हाजीम अब्दुल्ला मुजावर यांच्या दोन शेळ्या जागीच ठार झाल्या आहेत, ज्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नेरूळ दुर्गवड येथे राहणारे मुजावर यांच्या पाळीव बकऱ्यांवर बिबट्याने मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला केला. या अचानक झालेल्या हल्ल्यात त्यांच्या दोन शेळ्या मारल्या गेल्याने मुजावर यांचे मोठे नुकसान झाले आहे.
या परिसरामध्ये जवळच गाव वस्ती, तसेच धनगरवाडी असल्याने, बिबट्याचा अशाप्रकारे वावर वाढल्यामुळे येथील नागरिकांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे. स्थानिकांनी व्यक्त केलेल्या मतानूसार, गावातील अनेक जनावरे रात्रीच्या वेळी बाहेर दावणीला बांधलेली असतात. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे या सर्व जनावरांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
गावात वाढलेल्या बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थ मोठ्या चिंतेत आहेत. त्यांनी वनविभागाकडे तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात होणारे हल्ले टाळता येतील आणि नागरिकांना सुरक्षितता मिळेल. या झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्याकरता व पंचनामा करण्याकरता वन विभागाची टीम तेथे दाखल झाली असून पंचनामा सुरू आहे.










