कुडाळात दिव्यांग लाभार्थींसाठी UDID कार्ड तपासणी - नोंदणी शिबीर !

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: November 10, 2025 18:46 PM
views 25  views

कुडाळ : केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध सामाजिक न्याय योजनांतर्गत अर्थसहाय्य मिळणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे शिबीर कुडाळ येथे आयोजित करण्यात आले आहे. तहसिलदार विरसिंग वसावे यांच्यामार्फत या शिबिराची माहिती देण्यात आली आहे.

शिबिराचा उद्देश आणि आवश्यकता

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना यांसारख्या योजनांमधून समाजातील निराधार व्यक्तींना दरमहा अर्थसहाय्य दिले जाते.

दिव्यांग कल्याण विभागाच्या नवीन शासन परिपत्रकानुसार (दि. २७.०६.२०२४) केंद्र शासनाच्या धर्तीवर दिव्यांगत्वासंदर्भातील सर्व लाभ मिळविण्यासाठी वैश्विक ओळखपत्र  हे बंधनकारक करण्यात आले आहे.

शिबिराचे आयोजन

कुडाळ तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी त्यांच्या UDID कार्डची पडताळणी करण्यासाठी आणि जुने दिव्यांगत्व प्रमाणपत्र असलेल्यांना नवीन ऑनलाईन UDID कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी हे विशेष तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

दिनांक | २१ नोव्हेंबर २०२५ 

वेळ : सकाळी ११:०० ते सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत 

ठिकाण : जिल्हा महिला व बालरुग्णालय, कुडाळ 

ज्या लाभार्थ्यांकडे सध्या वैश्विक ओळखपत्र नाही, त्यांनी शिबिरापूर्वी नवीन कार्ड काढण्यासाठी खालीलप्रमाणे नोंदणी करणे आवश्यक आहे:

 * वेबसाईट: शासनाच्या www.swavlambancard.gov.in या पोर्टलवर जाने.

 * नोंदणी: लाभार्थी यांनी जवळच्या महा ई सेवा केंद्रात जाऊन फॉर्म भरणे आवश्यक आहे.

 * आवश्यक कागदपत्रे: फॉर्म भरताना खालील कागदपत्रे लागतील:

   * आधारकार्ड

   * रेशनकार्ड

   * फोटो

   * लाभार्थी यांची सही

नोंद : UDID पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर, त्याची नोंदणी पावती संबंधित लाभार्थी यांनी दिनांक २१.११.२०२५ रोजी आयोजित शिबिराचे वेळी स्वतः सोबत घेऊन येणे अनिवार्य आहे.

तहसिलदार विरसिंग वसावे यांनी कुडाळ तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी आयोजित शिबिरामध्ये वैश्विक ओळखपत्र व प्रमाणपत्रासह समक्ष उपस्थित राहून तपासणी करून घ्यावी आणि शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी UDID कार्डची अट पूर्ण करावी.