कोकणातील गरीब लोक 'लँड माफियां'चे शिकार..? | कोकणात चाललय तरी काय..?

कुडाळमध्ये जमीन वादातून कुटुंबाला मारहाण | मनसे आक्रमक
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: November 07, 2025 20:27 PM
views 73  views

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गालगत पिंगुळी-धुरीटेंबनगर येथे जमीन-जागेच्या जुन्या वादातून बुधवारी रात्री एका कुटुंबातील चौघांना लाकडी दांडे व लोखंडी रॉडने मारहाण करण्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेत पती-पत्नीसह त्यांची दोन मुले जखमी झाली असून, त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

या मारहाण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी कुडाळ पोलीस ठाणे गाठले आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आक्रमक भूमिका घेतली.

कुडाळ पोलीस ठाण्याचे पीआय राजेंद्र मगदूम यांनी मनसे शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे. त्यांनी सांगितले की, आरोपींचा शोध तपास चालू असून, त्यांना ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणाची नक्की चौकशी करून पीडित कुटुंबाला न्याय दिला जाईल.

'लँड माफिया'चे जाळे कुडाळात?

या गंभीर घटनेमुळे कुडाळमध्ये 'लँड माफिया' पुन्हा सक्रिय होत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. मुंबईसारख्या शहरांपाठोपाठ आता कोकणात, विशेषतः कुडाळसारख्या तालुक्यात जमिनी हडपण्यासाठी धमक्या आणि मारहाणीच्या घटना वाढत आहेत. भविष्यात कोकणातील गरीब लोक या 'लँड माफिया'चे शिकार बनणार नाहीत ना, अशी शंका नागरिकांमधून व्यक्त होत आहे. प्रशासनाने वेळीच या प्रकरणांची गंभीर दखल घेऊन 'लँड माफिया'चा बीमोड करणे गरजेचे आहे.