
कुडाळ : नाईक मराठा मंडळ मुंबई यांच्यावतीने साहित्य महर्षी गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर स्मृतिदिन आणि शताब्दी महोत्सव कार्यक्रम 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. स्व. मधुकर नारायण उर्फ बाबा आचरेकर स्मृती समाज गौरव पुरस्कार आरोग्य क्षेत्रातील जनसामान्यांचे देवदूत कै. डॉ. प्रमोद यांना (मारणोत्तर) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. डॉक्टर वालावलकर यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या चांगल्या कामामुळे गरिबांचा देवदूत असे त्यांना संबोधले जात होते आणि त्यांचा सत्कार करणे हा आमच्यासाठी हा बहुमान आहे. त्यांच्या पत्नी श्रीमती प्रज्ञा वालावलकर या त्या पुरस्काराचा स्वीकार करणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कवी व सांस्कृतिक कार्यकर्ते अजय कांडर व विशेष अतिथी म्हणून सिंधुदुर्ग देवळी समाज मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजन नाईक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नाईक मराठा मंडळ मुंबईचे कार्याध्यक्ष सुनील सांगेलकर यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
केंद्र सरकारने गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर यांचे कार्य लोकांच्या स्मरणात राहण्यासाठी गुरुवर्य केळूसकरांचे पोस्टर तिकीट (पोस्टाचे तिकीट) तयार कराव, अशी मागणीही त्यांनी केली.
नाईक मराठा मंडळाच्यावतीने कुडाळ एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृह येथे आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी चिटणीस किरण नाईक, खजिनदार विजय आणावकर, सदस्य मनोहर नाईक, विनायक पां. शिंदे उपस्थित होते. सांगेलकर म्हणाले, नाईक मराठा मंडळातर्फे गेली अनेक वर्षे विविध शिष्यवृत्ती उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. मुलांना दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च केला जातो. गेली 99 वर्ष ही संस्था काम करीत आहे. यावर्षी या कार्यक्रमाचे शभरावे वर्ष असल्यामुळे या कार्यक्रमाला सांवस्कृतीक कार्यक्रमाची जोड आहे. गुरुवर्य केळूसकरांना मराठीतील पहिले आद्य शिवचरीत्रकार म्हटले जाते. शिवचरित्र अनेकांनी लिहिली. परंतु त्यांनी पहिले चरित्र लिहीले. गुरुवर्याचे नाव व त्यांचे कार्य असेच सुरु राहिले पाहिजे. त्यासाठी नाईक मराठा मंडळ राज्य सरकार व केंद्र सरकार दरबारी प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले.
किरण नाईक म्हणाले, गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर यांचे कार्य लोकांच्या स्मरणात राहण्यासाठी केंद्र सरकारकडे गुरुवर्य केळूसकरांचे पोस्टर तिकीट (पोस्टाचे तिकीट) तयार करावे अशी मागणी केली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना याबाबत आम्ही निवेदन देऊन चर्चा केली आहे. त्यांनी लवकरात-लवकर पोस्ट तिकीटाची मागणी पूर्ण करेन असे आश्वासन दिले आहे. केळूसकरांचे मुळ गाव वेंगुर्ले तालुक्यातील केळूस येथे आहे. त्याठीकाणी केळूसकर यांचे केळूस गावी स्मारक बांधण्यासाठी पाचशे स्क्वेअर मीटर जागा मिळावी अशी मागणी त्यांनी केली.










