
कुडाळ : बुधवार, दिनांक १५ ऑक्टोबर रोजी मराठा हॉल येथे राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघ महाराष्ट्र कोकण आयोजित तसेच रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि लायन्स क्लब कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पांढरी काठी दिन मोठ्या उत्साहात आणि सामाजिक ऐक्याच्या भावनेने साजरा करण्यात आला.
या विशेष दिनानिमित्ताने कुडाळ शहरात दृष्टीहीन बांधवांची “जागृती रॅली” काढण्यात आली. ही रॅली कुडाळ बसस्थानक येथून प्रारंभ होऊन मराठा हॉल येथे संपन्न झाली. हातात पांढऱ्या काठ्या, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि मनात स्वावलंबनाचा दृढ संकल्प घेऊन दृष्टीहीन बांधवांनी शहरातून केलेली ही रॅली सर्वांच्या दृष्टीस भावली. समाजात दृष्टीहीन व्यक्तींबद्दल आदर, सहानुभूती आणि जागरूकता निर्माण व्हावी, तसेच त्यांच्या स्वावलंबनाचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचावा, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमस्थळी उपस्थित सर्व दृष्टीहीन बांधवांसाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या वतीने चहा व नाश्त्याची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती, तर लायन्स क्लब कुडाळ तर्फे स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित बांधवांना पांढऱ्या काठ्यांचे तसेच दिवाळी सणाचे साहित्य वाटप करून सणाचा आनंद सर्वांसमवेत साजरा करण्यात आला. या छोट्याशा उपक्रमातून समाजात संवेदनशीलतेचा आणि एकतेचा संदेश देण्यात आला.
या सामाजिक उपक्रमात रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे अध्यक्ष रोटेरियन राजीव पवार, सचिव मकरंद नाईक, लायन्स क्लब कुडाळ चे अध्यक्ष आनंद कर्पे, नवीन बांदेकर, डॉ. चेतना चुबे, युनियन बँक मॅनेजर, तसेच राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघाचे अध्यक्ष आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणातून दृष्टीहीन व्यक्तींच्या स्वावलंबनाच्या आणि समाजातील समान सहभागाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी या दिवसाचे औचित्य साधत “पांढरी काठी ही केवळ आधार नाही तर आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे” असा प्रेरणादायी संदेश दिला. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहवर्धक, भावनिक आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणारा ठरला.