
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गोवूळवाडी येथे आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. दुधाचा व्यवसाय करणाऱ्या राजाराम कृष्णा गावडे (वय ६९) यांचा मधमाशांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, राजाराम गावडे हे आज, सकाळी १० वाजण्याच्या सुमारास, नेहमीप्रमाणे दुधाचा व्यवसाय करत दूध घेऊन जात होते. याच वेळी अचानक मधमाशांच्या थव्याने त्यांच्यावर हल्ला केला. मधमाशांनी केलेल्या दंशामुळे राजाराम गावडे जागेवरच बेशुद्ध पडले.
ही घटना लक्षात येताच त्यांचे नातेवाईक मनोहर कृष्ण गावडे यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती राजाराम गावडे यांना मयत घोषित केले. एका ज्येष्ठ नागरिकाचा मधमाशांच्या हल्ल्यात अशा प्रकारे अकाली मृत्यू झाल्याने गोवूळवाडी परिसरात आणि कुडाळमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.