
कुडाळ : सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत मा. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून "शाळा तेथे दाखला" मोहीम राबविण्यात येत आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांना वय अधिवास प्रमाणपत्र व जातीचे दाखले उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. या उपक्रमाचा शुभारंभ कुडाळ हायस्कूल येथे करण्यात आला.
या प्रसंगी तहसिलदार विरसिंग वसावे यांनी शाळेस भेट देऊन कार्याचा आढावा घेतला. तसेच प्रातिनिधिक स्वरुपात इयत्ता आठवीची विद्यार्थीनी कु. आर्या राणे हिला तिचे वय अधिवास प्रमाणपत्र केवळ एका तासातच वर्गात जाऊन प्रदान केले, ही उपक्रमाची विशेष नोंद घेण्याजोगी बाब ठरली.
आज दिवसभरात विद्यालयातील 223 विद्यार्थ्यांचे वय अधिवास प्रमाणपत्राचे अर्ज स्वीकारण्यात आले असून त्यावरील प्रक्रिया पूर्ण करून येत्या सोमवारी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरित केली जाणार आहेत.या पद्धतीने कुडाळ तालुक्यातील 268 शाळांमधील एकूण 13,844 विद्यार्थ्यांना वय अधिवास प्रमाणपत्र तसेच जातीचा दाखला देण्यात येणार आहे. महसूल विभाग, शिक्षण विभाग, शाळा प्रशासन, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले शालेय पातळीवरच उपलब्ध होणार असून पालक व विद्यार्थ्यांचा वेळ, खर्च व श्रम यांची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.
याप्रसंगी निवासी नायब तहसिलदार अमरसिंह जाधव, कुडाळ हायस्कूलचे मुख्याध्यापक विपीन वराडे, वर्ग शिक्षक विजय मयेकर, निखिल ओरोसकर सर, CSC सेवाकेंद्र चालक वैभव जाधव, विद्यार्थी उपस्थित होते.