
कुडाळ : कुडाळ एमआयडीसी कुंभारवाडा या शाळेतील मुलांनी सादर केलेल्या गोफ नृत्याने गणेशोत्सवात सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ताल, रंग, सौंदर्य आणि एकोपा यांचा अनोखा संगम असलेल्या या पारंपरिक नृत्यातून विद्यार्थी केवळ आपली कलाच नव्हे, तर समाजोपयोगी कामेही करत आहेत.
गेली दोन वर्षे ही मुले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणी गोफ नृत्याचे सादरीकरण करत आहेत. या प्रयोगांच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत दीड लाख रुपयांचा (१,५०,०००/-) निधी जमा केला आहे. या निधीचा उपयोग त्यांनी शाळेच्या विकासासाठी केला आहे. यातून शौचालयासाठी ८० हजार रुपये, स्मार्ट टीव्हीसाठी २५ हजार रुपये आणि हार्मोनियमसाठी १८ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि ते लोकांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने हे गोफ नृत्य बसवण्यात आले आहे. पालकांच्या सहकार्यामुळे या नृत्याचे आतापर्यंत २५ प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत. या नृत्यात गार्गी भालचंद्र आजगावकर, खुषी महादेव खरात, आरुषी महेश सावंत, हर्षिता समीर हळदणकर, काव्या सतेश हळदणकर, ओवी सदानंद नाटळकर, वेदांत गोविंद नेमळेकर, आराध्य सचिन तुळसुलकर, चैतन्य महादेव खरात, निहाल नरेंद्र बावलेकर, योगीराज प्रमोद गावडे, वरद राहुल जोशी, हिमांशू सिताराम प्रभू देसाई तसेच कृष्णाच्या भूमिकेत प्रथम प्रल्हाद म्हाडदळकर हे विद्यार्थी सहभागी होतात. शाळेचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या सामूहिक प्रयत्नांनी सादर होणारे हे गोफ नृत्य, केवळ मनोरंजनाचे साधन नसून, समाजसेवेचा एक प्रभावी मार्ग ठरत आहे.