
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीने यावर्षी 'माझी वसुंधरा अभियान ६.०' आणि 'स्वच्छ सर्वेक्षण २०२५' अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गणेशोत्सवामध्ये होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नगरपंचायतीने कृत्रिम विसर्जन तलाव आणि निर्माल्य संकलनासाठी HDPE BED ची व्यवस्था प्रत्येक विसर्जन घाटावर केली होती. या उपक्रमात जमा होणाऱ्या निर्माल्यापासून कंपोस्ट खत तयार करून ते पुन्हा निसर्गात अर्पण करण्याचा नगरपंचायतीचा उद्देश आहे. या कार्यामध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा (ता. अलिबाग) ही संस्था नगरपंचायतीला मोलाचे सहकार्य करत आहे. जमा झालेले निर्माल्य श्री समर्थ बैठक सभागृह, पिंगुळी (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) यांच्या मार्फत विलगीकृत करून त्यापासून कंपोस्ट खत तयार केले जात आहे. हे खत नंतर वृक्षांना वापरले जाईल.
शाश्वत विकासाच्या दृष्टीने जलप्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी घेण्यात आलेल्या या उपक्रमात सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला. नागरिकांनी विघटनशील आणि अविघटनशील निर्माल्य स्वतंत्रपणे जमा करून पर्यावरणाच्या या महत्त्वपूर्ण कामात सहकार्य केले. कुडाळ नगरपंचायतीने केलेल्या या आवाहनाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून, हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी एक आदर्श उदाहरण ठरला आहे.