
कुडाळ : मी माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. परंतु, आपण देखील उबाठा सेनेतून भाजपमध्ये आलेले सात नगरसेवक किंवा भाजपचे २ निष्ठावंत नगरसेवक अशा नऊ जणांपैकी केवळ एकाने राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे. जनता कोणाच्या बाजूने आहे कळेल असे प्रत्युत्तर कुडाळचे नगरसेवक अभिषेक गावडे यांनी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलेल्या निलंबनाच्या कारवाईला दिले आहे.
कुडाळ नगरपंचायतच्या त्या ६ नगरसेवकांच्या निलंबनानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी काल याबाबत पत्रकार परिषद घेऊन आपण केलेल्या निलंबनाच्या कारवाईवर ठाम असल्याचे म्हटले. याला प्रत्युत्तर देताना नगरसेवक अभिषेक गावडे यांनी म्हटले की, सावंत साहेब आम्हाला राणेसाहेबांनी जेव्हा तिकीट दिले तेव्हा आपल्याच पक्षाच्या निष्ठावंत म्हणणाऱ्यांनी गद्दारी करून आमच्या विरोधात काम केले. खरी तर निवडणूक कमळ चिन्हावर लढलो असलो तरी राणे समर्थक विरुद्ध भाजप व सगळे अशीच माझ्या वार्डमध्ये झाली. त्याहीपेक्षा आपल्याच पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या विरोधात आर्थिक रसद पुरवली. तरी नगरपंचायत मध्ये आपल्या पक्षात सर्वात जास्त मताधिक्क्याने मी विजयी झालो. आपण माझे पक्षातून निलंबन केले मी नगरसेवक पदाचा देखील राजीनामा द्यायला तयार आहे. परंतु, आपण उबाठा पक्षाकडून घेतलेले सात नगरसेवक किंवा आपल्याकडे राहिलेले दोन निष्ठावंत नगरसेवक अशा नऊ जणांपैकी एकाने राजीनामा द्यावा व निवडणुकीला सामोरे जावे. मग जनता कोणाच्या बाजूने आहे हे लवकरच समजेल. अशा शब्दात नगरसेवक अभिषेक गावडे यांनी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना प्रत्युत्तर दिले आहे.