
कुडाळ : कुडाळ तालुक्यात दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाचा एक भाग म्हणून, घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये स्थापन झालेल्या श्री गणेश मूर्तींची मनोभावे पूजा करण्यात आली.
दीड दिवस चाललेल्या या पूजेनंतर, गुरुवारी सायंकाळी अनेक ठिकाणी गणेश मूर्तींना निरोप देण्यात आला. नदी, तलाव, ओहोळ आणि विशेषतः कुडाळ शहरातील भंगसाळ नदीसह नऊ गणेश घाटांवर भाविकांनी बाप्पांना निरोप दिला.
या विसर्जनासाठी नगर परिषद (न.पं.) प्रशासनाकडून ठिकठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी मंडप उभारण्यात आले होते. तसेच, न.पं. कर्मचारी आणि पोलीस प्रशासन गणेश घाटांवर तैनात होते. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या शांततापूर्ण आणि भक्तिमय वातावरणात भाविकांनी 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' अशा घोषणा देत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.