अशी झाली कुडाळ नगरपंचायतची सर्वसाधारण सभा

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: August 25, 2025 19:09 PM
views 75  views

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा सोमवारी येथील नं. पं. दालनात नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर - शिरवलकर यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील विविध विषयावर चर्चा करून खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत महाराष्ट्र शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्यावतीने शहरातील नगर पंचायत हद्दीतील सर्व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत तीन समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. शाळा व्यवस्थापन समिती, सखी सावित्री समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती या समित्यांवर वोर्ड न्याय नगरसेवकांची निवड करण्यात आली. तसेच प्रशासनाकडून भंडारी भवनाच्या जागेबाबतच्या प्रमाणापत्राला नाहरकत देण्यात आली.

कुडाळ - नाबरवाडी येथे गणेशघाट बांधणे अत्यंत गरजेचे आहे. तेथील लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. परंतु त्याठिकाणी काही व्यक्तीनी हरकत घेतली आहे. त्याबाबत लवकरा-लवकर तोडगा काढा, अशी मागणी नगरसेविका श्रेया गवंडे यांनी नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांच्याकडे केली. ज्यानी हरकत घेतली आहे. त्या संबधीतांना बोलावून घेऊन त्यांच्याशी बोलून हा प्रश्न मार्गी लावूया, असे नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर व उपगराध्यक्ष किरण शिंदे यांनी सांगितले.

कुडाळ नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा आज नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील नं. पं. दालनात आयोजित करण्यात आली होती. 

नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे,मुख्याधिकारी अरविंद नातू,  श्रेया  गवंडे,  नगरसेवक मंदार शिरसाट,उदय मांजरेकर, नगरसेविका आफरीण करोल, चांदणी कांबळी, अँड राजीव कुडाळकर, सृती वर्दम, ज्योती जळवी, नयना मांजरेकर, विलास कुडाळकर,अभिषेक गावडे, अक्षता खटावकर, गणेश भोगटे व कर्मचारी उपस्थित होते.

शहरातील विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. शहरातील भंगसाळ नदी येथील गणेश घाट येथे लाईटीग करा. तसेच त्याठिकाणी मंड उभारून नगरपंचायतीचा बॅनर लावा, असे प्राजक्ता बांदेकर, किरण शिंदे  व उदय मांजरेकर यांनी सांगितले. नगरपंचायत येथे कृतीम गणेश विसर्जन तलाव बांधण्याबात चर्चा करण्यात आली. मच्छी मार्केट येथील ओडब्लूसी  मशीनच्या दुरुस्तीबाबत चर्चा करण्यात आली. त्या मशीनचे बील महिन्याला 70 हजार रुपये येत असेल तर काय उपयोग? असा सवाल सर्वच नसगसेवकांनी उपस्थित केला. त्या मशीनचे बिल नेमके महिन्याला 70 हजार रुपये येते की चार-पाच महिन्याला 70 हजार रुपये येते याची माहिती गोळा करून पुढील सभेत ठेवा असे प्राजक्ता बांदेकर व किरण शिंदे यांनी सांगितले.

नगरपंचायतीसाठी लवकरात लवकर जनरेटर खरेदी करा, अशा सूचना अरविंद नातू यांनी राजू पठाण यांना दिल्या. जनरेटर घेताना चांगल्यातला घ्या. पुढच्या दृष्टीने तो आवश्यक आहे, असे किरण शिंदे व उदय मांजरेकर यांनी सांगितले. एमआयडीसी येथील नवीन हायमास्टची वर्क ऑर्डर होऊनही कॉन्ट्रॅक्टर सात आठ महिने झाले तरी बसवत नाही असे किरण शिंदे यांनी सांगितले. त्यावर प्राजक्ता बांदेकर यांनी त्याला बोलावून  घ्या, असे सांगितले. शहरातील सौरदीप लावले आहेत त्यावर काही ठिकाणी झाडी वेली चढल्या आहेत. तसेच काही सौरदीप प्रकाश कमी पडतो. त्याची दुरुस्ती करा, उदय मांजरेकर यांनी सांगितले.