
कुडाळ : गणेश चतुर्थीसाठी बाजारपेठेत होणारी गर्दी आणि त्यामुळे उद्भवणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कुडाळ पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मगदूम यांनी अवजड व मोठ्या वाहनांना बाजारमार्गे जाण्यास तात्पुरती बंदी घातली आहे.
गणेश चतुर्थीला पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने लोक खरेदीसाठी कुडाळ बाजारपेठेत येतात. त्यामुळे बाजारपेठेत वाहनांची मोठी गर्दी होते. अवजड वाहनांमुळे ही गर्दी आणखी वाढत होती, परिणामी वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत होती. यामुळे नागरिकांना आणि पोलिसांनाही अडचणी येत होत्या.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पी.आय. मगदूम यांनी मोठ्या व अवजड वाहनांना आता राज हॉटेल मार्गे वळवले आहे. यामुळे बाजारपेठेतील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून, पोलिसांच्या या चांगल्या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.
या उपाययोजनेमुळे गणेश चतुर्थीच्या खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे, तसेच बाजारपेठेतील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होईल अशी आशा आहे.