कुडाळ बाजारपेठ गणपती उत्सवासाठी सज्ज

बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: August 23, 2025 12:16 PM
views 62  views

कुडाळ : सिंधुदुर्ग: गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर आल्याने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा गणेशोत्सवासाठी सज्ज झाला आहे. कुडाळ शहरातील बाजारपेठांमध्ये गणपतीच्या सजावटीचे साहित्य, विद्युत रोषणाईचे सामान आणि पूजेच्या वस्तूंनी दुकाने भरून गेली आहेत. गणेशभक्तांची खरेदीसाठी गर्दी वाढत असून,  गणपतीचे फोटो प्रिंट असलेली टी-शर्ट बाजारपेठेत उपलब्ध झालेली आहे. बाजारपेठेत कपड्यांच्या दुकानांमध्ये ठीक ठिकाणी असे टीचर्स लावलेले पाहायला मिळाले. गावांमध्ये चालणारी भजन असो वा आरती असो यावेळी अशी टी-शर्ट घालण्याची ट्रेंड सध्या कोकणात जोरदार चालू आहे.

सजावटीचे पडदे, तोरण, कागदी फुले, फुलांच्या लडी, झुंबर, मोत्यांचे हार, प्लास्टिकचे विविध सजावटीचे सामान अशा अनेक प्रकारची  गणपती सजावटीची सामान उपलब्ध आहे. प्लास्टिकचे सामान जास्त काळ टिकते व ते पुन्हा पुन्हा वापरता येते यामुळे लोकांची मागणी जास्त वाढत चालली आहे. कुडा बाजारपेठे ठिकठिकाणी अशा हारांची व प्लास्टिकच्या सामानांची दुकाने लावलेली पाहायला मिळतात.  

मूर्तिकारांची लगबग शिगेला

गणेशोत्सवाच्या तयारीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणपतीची मूर्ती. चतुर्थी जवळ आल्याने मूर्तिकारांची लगबग शिगेला पोहोचली आहे. मूर्तींना अंतिम रंग देण्यापासून ते पूर्ण करण्यासाठी मूर्तिकार रात्रंदिवस मेहनत करत आहेत. कमी वेळात मूर्तींचे काम पूर्ण करून त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची गडबड सुरू आहे. गणपतीच्या मूर्तींचे काम पूर्ण करतेवेळी मूर्तिकारांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेळोवेळी लाईट जाणे, मातीच्या प्रती चांगल्या मिळतील याकडे लक्ष देणे, मातीत जास्त वेळ ओलावा राहत असल्यामुळे सुकवण्यासाठी वेळ देणे, वाढलेल्या महागाई मध्ये वाढलेले रंगांचे भाव, सध्या कोकणामध्ये जाणवत असलेली आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे कारागिरांची कमी यामुळे कारागिरांना देखील मानधन वाढवावे लागलेले आहे, जरी टेक्नॉलॉजी बदलत असली तरी प्रत्येक ठिकाणी माणसाचा मेहनतीचा वापर करावाच लागत आहे अशा अनेक समस्यांना मूर्तिकारांना तोंड द्यावे लागत आहे. गणेश चतुर्थीला आता अवघे काहीच दिवस उरलेले आहेत त्यामुळे गणपती लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी मूर्तिकारांची रात्रीचे वेळ पण काम करून मूर्ती पूर्ण करण्याचे प्रयत्न चालू आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती हलकी येत असल्यामुळे सिंधुदुर्ग देखील आता या मूर्तींची विक्री चालू आहे मात्र जुन्या परंपरेने आलेल्या मातीच्या गणपतीचा स्थानिक जनतेमध्ये जास्त मागणी असल्याचा अनुभव येत आहे. काही स्थानिकांच्या मते व मूर्तिकारांच्या मते प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे विसर्जन केले असता त्या मूर्तीला पाण्यामध्ये विरघळण्यास जास्त वेळ लागतो तसेच गणपती मूर्तीचे विटंबन झाल्यासारखे वाटते. यामुळे आपल्या परंपरेला न सोडता सर्वांनी मातीच्या किंवा इको फ्रेंडली गणपती मूर्तींचा पूजेसाठी वापर करावा अशी मागणी जनसामान्यातून होत आहे. 

गणेशोत्सव म्हटला की भजन आणि वाद्ये आलीच. या काळात भजनी मंडळांची तयारी जोरदार सुरू असते. त्यामुळे, वाद्य दुरुस्तीच्या दुकानांमध्येही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पेटी, ढोल, ताशा, मृदंग, तबला यांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात काम आले आहे. वाद्य बनवणारे कारागीर सांगतात की, पारंपरिक वाद्यांबरोबरच आता आधुनिक वाद्यांचाही वापर वाढला आहे. दादा परब यांच्या मते पखवाज हाती कातली जात होते मात्र आता मशीन वरती ते कातले जातात पूर्वी असणारी किंमत आणि आताचा असणारे किंमतीमध्ये खूप मोठी तफावत आहे. पूर्वी या वाद्यांना जास्त मागणी नव्हती मात्र आता या वाद्यांची मागणी वाढलेली पहावयास मिळते. चामड्याच्या वापरावर आलेल्या बंदीमुळे वादी जी तबला व पखवाज बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते तिची किंमत वाढलेली पहावयास मिळाली यामुळे वाद्यांच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. नवीन स्केल चेंजर तबला, सिंथेटिक वाद्य जरी मार्केटमध्ये आली असली तरी परंपरागत जुनी पद्धत आहे त्यानुसारच चामड्याच्या वादीच्या पकवाजला आजही बाजारात मागणी आहे. जुन्या पिढीतल्या लोकांना आधुनिकता आणता आली असती मात्र पकवाजाची व तबल्याची आवाजाची तालबद्धता व मधुरता ही चामड्याने येते हे त्यांना माहीत होते. दुकानदार या नात्याने लोक माझ्याकडे येऊन जी मागणी करतात तसे मी त्यांना वाद्य बनवून देतो मात्र मला ही गोष्ट स्वतःलाच मान्य नाही असे मत परब यांनी व्यक्त केले. 

संतोष बापू मिस्त्री राहणार नेरूळ यांच्याकडे पेटी तबला पखवाज मृदुंग ढोल ताशा अशा अनेक संगीतमय वाद्यांचे प्रकार बनवले व दुरुस्त केले जातात हार्मोनियम दुरुस्त करणे हा त्यांचा पहिला व्यवसाय होता. यांच्याशी चर्चा करत असताना असे आढळले की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वाद्ये कशी अधिक चांगली बनवता येतात, यावरही ते लक्ष केंद्रित करत आहेत. मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये मृदुंग, तबल्याचे स्केल योग्य आहेत की नाही तपासण्यासाठी त्यांना सोपे पडत आहे. अशी आधुनिक पद्धती वापरून काम लवकरात लवकर पूर्ण करता येते असे त्यांची मत होते. यांच्या मते पखवाजाची गोडी इतर कोणत्याही आधुनिक वाद्यात येत नाही. मिस्त्री यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विविध वाद्यांचे अविष्कार केलेले पहावयास मिळाले. 

उत्सवाचा उत्साह शिगेला

एकूणच, गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाजारपेठा, मूर्तिकारांच्या कार्यशाळा आणि वाद्य दुरुस्तीची दुकाने सर्वत्र उत्साहाने भरलेली दिसत आहेत. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वजण मोठ्या तयारीने आणि आनंदाने तयारी करत आहेत.