
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारिता चिकीत्सक आहे. या जिल्ह्यातील पत्रिकारीतेने विकासाचे मोठे चित्र पाहिले आहे. समाज घडवण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पत्रकार, पोलीस व प्रशासन यांनी एकत्र येवून काम केले पाहिजे. आपल्या जीवनात आपण अनेक संघर्ष पाहिले आहेत. पण जीवनप्रवासातील बदलामध्ये पत्रकाराचे सानिध्य, दिशादर्शन निश्चितच मोलाचे ठरले आहे, असे प्रतिपादन कुडाळ मालवण मतदार संघाचे आम. निलेश राणे यांनी केले. माणगाव दत्त मंदिर येथे झालेल्या कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
कुडाळ तालुका पत्रकार समितीचा पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी श्री क्षेत्र माणगांव दत्त मंदीर येथे संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आम. निलेश राणे तसेच कुडाळ तहसिलदार विरसिग वसावे, कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, परिषद प्रतिनिधी गणेश जेठे, माणगांव सरपंच सौ. मनिषा भोसले, श्री दत्तमंदिर सचिव श्री. साधले, जिल्हा पत्रकार संघ कार्यकारिणी सदस्य राजन नाईक, कुडाळ तालुका पत्रकार समिती अध्यक्ष विजय पालकर, पुरस्कार प्राप्त पत्रकार विजय शेट्टी, अनिकेत उचले आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार निलेश राणे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते द्विपप्रज्वलन करून पुरस्कार वितर सोहळ्याचा शुभारंभ झाला. यानतर आम. निलेश राणे यांच्या हस्ते ग. म. तथा भैय्यासाहेब वालावलकर उत्कृष्ठ जिल्हा पत्रकार पुरस्काराने पत्रकार विजय शेट्टी, कै वसंत दळवी ग्रामीण पत्रकार पुरस्काराने नेरूर येथील राजन सामंत, ग. म. तथा भैय्या साहेब वालावलकर उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्काराने कणकवली येथील छायाचित्रकार अनिकेत उचले यांना सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या सोहळ्यात पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पत्रकारांचाही सन्मान करण्यात आला. यामध्ये नृत्य क्षेत्रातील यशाबाबत मृणाल अजय सावंत, अनुष्का अजय सावंत, सायली राजन सामंत, मृणाल प्रमोद ठाकूर, तसेच पत्रकारांमध्ये चेंबर ऑफ कॉमर्सच्या सदस्यपदी निवड बद्दल राजन नाईक, राष्ट्रगीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांकप्राप्त वैशाली खानोलकर, कोमसापच्या सोशल मीडिया समिती प्रमुखपदी निवड बद्दल निलेश जोशी यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना आम.निलेश राणे म्हणाले, आपल्याला यापुढे कोकणाच्या विकासाचे स्ट्रक्चर बनवायचे आहे आपण कुठेही गेलो तरी जिल्ह्याचा विकास कसा होईल हे पाहत असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अर्थकारण सुधारले पाहिजे यासाठी आपण धडपडत आहे. राणे कुटुंबीयांवर लोकांनी जो विश्वास दाखवला आहे त्याची आपल्याला जिल्हा विकासाच्या माध्यमातून परतफेड करायची आहे. आपल्या स्वभावामध्ये व कार्यपद्धतीत पत्रकारांनी वेळोवेळी सुचवलेल्या सूचना यामुळे मोठा बदल घडला. पत्रकारांच्या सानिध्यात राहून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. आपण लोकसभेमध्ये खासदार असताना किंवा विधानसभा अधिवेशनात ज्या विषयांवर भाषणे केली ते पत्रकारांच्या चर्चेतीलच विषय होते. त्यामुळे आपल्या जडण घडणीत पत्रकारांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. पोलीस प्रशासनाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या ड्रग्जमुक्त अभियान अंतर्गत पोलीस प्रशासनाने केवळ रेड न करता त्याचं मूळ शोधले पाहिजे. हे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
तहसीलदार विरसिंग वसावे म्हणाले, सद्यस्थितीत पत्रकारिता या क्षेत्राला वेगळे स्वरूप यायला लागले आहे. या क्षेत्रात काम करताना अभ्यास महत्त्वाचा असून कायदेविषयक ज्ञान असलेला पत्रकार हा एक घटक आहे. पत्रकारांना नेहमी जागृत रहावे लागते. देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पत्रकारांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. पत्रकारांनी नेहमी विकास पत्रकारितेवर लक्ष केंद्रित करावे. चांगल्या विषयांना प्रोत्साहन देऊन विकासात्मक बातम्या द्याव्यात. पत्रकारिता लोकशाहीतील चौथा स्तंभ असल्याने जबाबदारी अधिक आहे. सर्वसामान्य जनतेचे जीवनमान सुधारण्यासाठी पत्रकारितेची मदत होते असे सांगितले.
पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम म्हणाले, पत्रकारांनी नि:स्पृह व नि:पक्षपातीपणे काम करावे. पत्रकार हा समाजातील बुद्धिजीवी घटक आहे. स्वातंत्रपूर्व काळापासून आजपर्यंत पत्रकारिता क्षेत्राला समाज सुधारण्याचे माध्यम म्हणून पाहिले जाते. अगदी तळागाळापर्यंत जाणारा पत्रकार हा एक घटक आहे. विविध गुन्ह्यांच्या तपास मध्ये पत्रकारांनी सहकार्य करावे. तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने सद्यस्थितीत ड्रग्ज मुक्त अभियान राबविण्यात येत आहे त्यात सहकार्य करावे असे आवाहन केले. परिषद सदस्य गणेश जेठे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारिता पारदर्शक,स्वच्छ व विकासाभिमुख आहे. पत्रकार चळवळीतला आपण एक घटक आहे. तसेच तो भजन, दशावतार, साहित्य, नाटक, लोकशाही या प्रत्येक क्षेत्रात निपुण आहे. लोकशाही क्षेत्रातही पत्रकारांनी चांगले काम केले आहे. तसेच भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यास सहकार्य करण्यास पत्रकार सदैव तत्पर आहे असे सांगितले. माणगाव सरपंच मनीषा भोसले यांनी पत्रकार हा समाजाचा आरसा असून ते समाजाचे वास्तव रूप दाखवतात असे सांगितले.
सत्कारला उत्तर देताना पुरस्कार प्राप्त पत्रकार विजय शेट्टी यांनी ज्यांच्या नावाने आपल्याला पुरस्कार मिळाला त्या भैय्यासाहेब वालावलकर यांच्या परखड पत्रकारितेची काही उदाहरणे विशद केली. भैय्यासाहेब वालावलकर हे केवळ पत्रकार नव्हते तर ते स्वतंत्रसेनानीही होते. त्यांचे विविध चळवळींमध्ये मोठे योगदान असल्याचे सांगितले. यावेळी पुरस्कारप्राप्त पत्रकार राजन सामंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार समितीचे अध्यक्ष विजय पालकर, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन निलेश जोशी यांनी केले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक नेते सावळाराम अणावकर, कुडाळचे माजी नगराध्यक्ष विनायक राणे, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्याम पावसकर, माणगावचे माजी सरपंच सचिन धुरी, ठाकरे शिवसेनेचे युवक जिल्हाध्यक्ष योगेश धुरी, कुडाळ तालुका खरेदी प-विक्री संघाचे संचालक निलेश तेंडुलकर, चेंदवण माजी सरपंच देवेंद्र नाईक, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी पांडुरंग सावंत, तसेच पत्रकार, ज्येष्ठ नागिरक, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी ऊपस्थित होते.