
कुडाळ : गेली अकरा वर्षे मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. मात्र हे काम अद्यापपर्यंत पूर्ण झाले नाही.हा रस्ता खड्डेमय झाला आहे.अनेक ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. कामे अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांनी आता भाजप पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्या ठेकेदारांवर कारवाई केली जात नाही.सद्यस्थितीत कामाची गती पाहता अजून दोन तीन वर्षे हा महामार्ग पूर्ण होऊ शकेल असे वाटत नाही. त्यामुळे पुढील वर्षभरता हा महामार्ग पूर्ण व्हावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या बुधवार दि. १३ ऑगस्ट २०२५ रोजी कुडाळ तालुक्यातील हुमरमळा येथे मुंबई गोवा महामार्गावर सकाळी ११ वाजता रास्तारोको आंदोलन छेडण्यात येणार आहे.सिंधुदुर्ग जिल्हावासीयांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केले आहे
२०१४ मध्ये मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली. या कामात एकूण सहा टप्पे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन टप्पे पूर्ण करण्यात आले आहे. मात्र त्या रस्त्यावरही खड्डे पडले आहेत. या मार्गावरील कणकवली, पणदूर येथील उड्डाण पुलाला पाच सहा वर्षात भेगा गेल्या आहेत. अनेक ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. महामार्गावरील अपघातात जवळपास ४ हजार बळी गेले आहेत. त्यामुळे महामार्ग सुस्थितीत झाला पाहिजे म्हणून सरकारला जाग आणण्यासाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग वगळता इंदापूर पासून लांजा पर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे काम अपूर्ण आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील ठेकेदार तीन तीन वेळा बदलण्यात आले आहेत. २०१४ मध्ये काम घेऊन २०१६ पर्यंत ठेकेदाराने काम केले नाही म्हणून त्याला नोटीस देऊन २०१९ मध्ये नवीन ठेकेदार नेमण्यात आला. त्यानेही काम पूर्ण केले नाही म्हणून २०२२ मध्ये पुन्हा नवीन ठेकेदार नेमण्यात आला. तिसऱ्या ठेकेदारानेही काम अपूर्ण ठेवले आहे. कामे अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांनी आता भाजप पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्या ठेकेदारांवर कारवाई केली जात नाही. नितीन गडकरी यांनी देशातील अनेक महामार्ग पूर्ण केले परंतु मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबाबत तारीख वर तारीख दिली जात आहे. महामार्गाच्या अपूर्ण कामाबाबत कोकण वासियांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.सद्यस्थितीत कामाची गती पाहता अजून दोन तीन वर्षे हा महामार्ग पूर्ण होऊ शकेल असे वाटत नाही. त्यामुळे पुढील वर्षभरता हा महामार्ग पूर्ण व्हावा यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.