'महाभारताचे अंतरंग' पुस्तकाचं प्रकाशन

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: August 11, 2025 15:14 PM
views 21  views

कुडाळ : वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी महाभारताचा अभ्यास करून त्यावर पुस्तक लिहिणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमधील १५ वर्षीय वेदांत विवेक पंडित याच्या 'महाभारताचे अंतरंग' या पुस्तकाचे प्रकाशन आज सायंकाळी वैद्य परीक्षित शेवडे यांच्या हस्ते झालं. कोव्हिड काळात सहाव्या इयत्तेत असताना वेदांत याने कुतूहलापोटी महाभारतावरची पुस्तके वाचली. त्यावर सुरुवातीला इंग्रजीतून लेखन केलं. मग त्याने यावर मराठीत लेखन केलं. आज वेदांत दहावीत आहे. पण त्याने केलेलं वैचारिक काम खूप मोठं आहे अशा शब्दात वेदांतच कौतुक केलं. सुप्रसिद्ध वैद्यराज सुविनय दामले यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे.

आरती प्रभू कला अकादमी सभागृहात आयोजित केलेल्या या प्रकाशन सोहळ्याला वैद्यराज परीक्षित  शेवडे, पुस्तकाची प्रस्तावना लिहिणारे सुप्रसिद्ध वैद्य सुविनय दामले, लेखक वेदांत पंडित हे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते योगेश्वर श्री कृष्ण, भारतमाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. यावेळी उपस्थित पाहुण्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच सौ. पंडित आणि सौ. देसाई यांनी मान्यवरांचे औक्षण करून राक्षबंधन केले. इयत्ता सहावीत असताना कोरोनाच्या काळात वेदांतने पुस्तक लिहायला सुरुवात केली. सुरुवातीला मराठीतुन इंग्रजीत भाषांतर केले. नंतर मराठीतून पुस्तक लिहिले. या पुस्तकाची प्रस्तावना वैद्य सुविनय दामले यांची आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी बी शिरसाट यांनी प्रूफरीडिंग केले आहे. तर रवळनाथ प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. याचे पिंटिंग आकार प्रिंटर्स कुडाळ येथे झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

वेदांतने एवढ्या लहान वयात महाभारतावर केलेलं भाष्य हे कौतुकास्पद आहे अशा शब्दात वैद्य दामले यांनी वेदांतचे कौतुक केले. लहान मुलांअगोदार मोठ्यांनी हे पुस्तक वाचणे गरजेचे असल्याचे वैद्य दामले म्हणाले. अनेक भाषांमध्ये हे पुस्तक यावं आणि महाभारत सर्वदूर पोहोचावे अशी अपेक्षा वैद्य दामले यांनी या निमित्ताने व्यक्त केली. आपल्या मनोगतातून लेखक वेदांत पंडित याने हे पुस्तक लेखना मागची आपली भूमिका स्पष्ट केली. महाभारत का झाले याची त्याने कारणे देखील सांगितली.

पुस्तक प्रकाशन वैद्यराज परीक्षित शेवडे याबच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी  देखील लेखक वेदांत पंडित याचे कौतुक करून त्याला शुभेच्छा दिल्या. एका वैद्याने वेदांतच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आणि दुसऱ्या वैद्याने या पुस्तकाचे प्रकाशन केले हा एक चांगला योग असल्याचे त्यांनी सांगितले.  त्याचबरोबर उत्तरोत्तर लिहीत राहा असा सल्ला वेदांत याला दिला. त्यांनतर श्री. शेवडे यांनी महाभारतावर विवेचन केले. मान्यवरांचे स्वागत विवेक पंडित आणि कुटुंबीयांनी केले. सुत्रसंचलन विवेक मुतालिक यांनी तर आभार प्रदर्शन विवेक पंडित यांनी केले. यावेळी विवेक पंडित, मिलिंद देसाई, बी बी शिरसाट, प्रसाद शिरसाट, अरविंद शिरसाट, सीए अजित फाटक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.