देवळी समाजाचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: August 11, 2025 14:53 PM
views 78  views

कुडाळ : तालुक्यात नुकताच देवळी समाजाचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला आणि अनेक मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला समाजाचे जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्यासह चंद्रकांत अनावकर, बाळ कन्याळकर, सावळाराम अनवकर, वर्षा कुडाळकर आणि इतर अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या.

या सोहळ्यात प्रमुख वक्त्यांनी आपले विचार व्यक्त केलेत...

चंद्रकांत अणावकर यांनी संस्कृती या विषयावर आपले विचार मांडले. आचार्य विनोबा भावे यांच्या 'प्रकृती', 'विकृती' आणि 'संस्कृती' या संकल्पनांचा संदर्भ देत ते म्हणाले की, आपल्याकडे असलेल्या भाकरीपैकी अर्धी भाकरी उपाशी व्यक्तीला देणे हीच खरी संस्कृती आहे आणि देवळी समाजाने ही संस्कृती जपली आहे. त्यांनी शिक्षकांनी ज्ञानसत्तेचे पुजारी बनून लक्ष्मीपेक्षा सरस्वतीला अधिक महत्त्व देण्याचे आवाहन केले. तरुणांनी अडथळ्यांना घाबरून न जाता पुढे जात राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

बाळ कनयाळकर यांनी  यांनी देवळी समाजात शिक्षकांची संख्या अधिक असल्याचे सांगितले. समाजाचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर वार्षिक सभासदत्व नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले. ओबीसी आरक्षण जाहीर झाल्याने आता समाजाला न्याय मिळवून देण्याची संधी आहे आणि त्यासाठी प्रत्येक गावात कमिटी स्थापन करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

सावळाराम अणावकर यांनी देवळी समाजाच्या इतिहासावर प्रकाश टाकला. यादव काळापासून देवळांशी संबंधित कामांमुळे देवळी समाज अस्तित्वात आला. देवळांची साफसफाई आणि इतर कामांसाठी शासनाकडून देवळी समाजाला जमिनी देण्यात आल्या होत्या, पण आता शासनाचा डोळा या जमिनींवर आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शिवाजी महाराजांनी उपेक्षित समाजाला एकत्र केले, त्याचप्रमाणे आपणही एकत्र यायला हवे असे ते म्हणाले. शासनाच्या गॅझेटमध्ये ‘देवळी’ हा शब्द आहे, त्यामुळे आपली ओळख सांगायला लाजू नये असे आवाहन त्यांनी केले.

वर्षा कुडाळकर: वर्षा कुडाळकर यांनी लहानपणी देवळी असल्यामुळे सोसावे लागलेले त्रास सांगितले. तेव्हा आजोबांनी 'आपण देवाच्या सगळ्यात जवळची जात आहोत' असे सांगून आत्मविश्वास दिला. काही लोकांनी जुनी आडनावे बदलली, पण आता तेच लोक देवळी असल्याचा पुरावा घेण्यासाठी येत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. वाढत्या आत्महत्या आणि तरुणाई चुकीच्या मार्गावर जात असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आणि समाजाला एकत्र येऊन न्याय मिळवून देण्याचे आवाहन केले.

 * राजन नाईक: समाजाचे जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी समाजाच्या आग्रहामुळे आपण हे पद स्वीकारल्याचे सांगितले. गोव्यातील ओबीसी मेळाव्यात देवळी समाजाचा एकही सदस्य उपस्थित नव्हता याची त्यांनी खंत व्यक्त केली. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न  करू असे आश्वासन त्यांनी दिले. या कार्यक्रमात भास्कर केरवडेकर (कुडाळ तालुकाध्यक्ष), अर्चना घावनरकर (सचिव), आणि प्रदीप कुडाळकर (खजिनदार) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. त्यांनी सर्वांचे आभार मानून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी समाजाच्या हितासाठी काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी मंदार परुळेकर, डॉ. पी.जी वजराटकर, प्रकाश सावंत, दिनेश आजगावकर, रश्मी मठकर, प्रसाद पोईपकर, भास्कर कविटकर, सुहास पाटकर, अॅड. विवेक मांडकुलकर, तेंडोली सरपंच अनघा तेंडोलकर, रोशनी मठकर, तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.