
पिंगुळी : महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणारा दहिकाला उत्सव अर्थात दहीहंडी पिंगुळी गावात यंदा एकच साजरी केली जाणार आहे. गेले काही वर्षे स्वतंत्रपणे साजरा होणाऱ्या या उत्सवासाठी सरपंच अजय आकेरकर यांनी पुढाकार घेऊन गावातील सर्व मंडळांना एकत्र आणले. पिंगुळी गावात पूर्वी एकच मानाची दहीहंडी साजरी होत असे, मात्र गेल्या वर्षी काही मंडळांनी स्वतंत्र दहीहंडी उत्सव साजरा केला. यामुळे गावात पुन्हा एकदा एकच दहीहंडी असावी अशी बऱ्याच मान्यवरांची इच्छा होती.
सरपंच अजय आकेरकर यांनी पुढाकार घेत सर्व मंडळांची एकत्रित बैठक आयोजित केली. यावेळी गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत मंडळांमधील गैरसमज आणि अडचणी दूर करण्यात आल्या. या बैठकीत सर्वांनी एकमताने यापुढे गावात एकच दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी सरपंच अजय आकेरकर यांच्यासह सदस्य शशांक पिंगुळकर, मिलिंद परब, प्रदीप माने, धीरज परब, सागर रणसिंग, सतिश धुरी, राजन पांचाळ, राघोबा धुरी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच, विविध मंडळांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने युवकही उपस्थित होते. यावर्षी सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या दहीहंडी उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.