
कुडाळ : कुडाळ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने शुक्रवारी सायंकाळी नारळी पौर्णिमेनिमित्त भव्य रिक्षा रॅली काढत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. ठाकरे शिवसेना प्रणित रिक्षा संघटनेच्या वतीने डीजेच्या तालावर निघालेल्या या रॅलीने शहराच्या मुख्य बाजारपेठेतून प्रवास करत भंगसाळ नदीत मानाचा नारळ (श्रीफळ) अर्पण केला.
शिवसेना शाखेतून या रॅलीला सुरुवात झाली. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर, शहरप्रमुख संतोष शिरसाट, युवासेनेचे शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर आणि शेखर गावडे, तसेच युनियनचे नागेश जळवी, बाळा वेंगुर्लेकर, सत्यवान कांबळी, गोट्या चव्हाण आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रिक्षा व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचीही विशेष उपस्थिती होती. वैभव नाईक, अमरसेन सावंत आणि अमित सामंत यांच्या हस्ते भंगसाळ नदीपात्रात नारळ अर्पण करण्यात आला. नागरिकांनीही मोठ्या संख्येने नदीपात्रात नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा साजरी केली. हा कार्यक्रम पाहण्यासाठी भंगसाळ नदीवर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांच्या चांगल्या नियोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडला.