
कुडाळ: कुडाळ-नेरूळ-मालवण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे, कार्यालयातील हालचाल नोंदवही (Movement Register) २०२४ पासून कोरी असल्याने विभागाच्या कामकाजावरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अधिकारी अनुपस्थित, कामगारांच्या जीवावर काम
कुडाळ-नेरूळ रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना ठेकेदाराचे कामगार काँक्रीट भरत होते. या कामाच्या देखरेखीसाठी संबंधित अधिकारी, म्हणजेच जेईई पाटोळे, उपस्थित असणे आवश्यक होते. मात्र, त्यांच्याऐवजी केवळ एका चतुर्थश्रेणी कामगाराला तिथे नेमण्यात आले होते. या कामगाराने अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना साइटवर बोलावले असता, 'येतो' असे सांगूनही ते वेळेवर पोहोचले नाहीत. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर कुणाचेही नियंत्रण नव्हते.
सुरक्षेचे नियम धाब्यावर
रस्त्याचे काम सुरू असताना तिथे कोणतेही बॅरिकेट लावलेले नव्हते, ज्यामुळे अपघाताचा धोका होता. तसेच, काँक्रीट ओतल्यावर लगेचच वाहनांची ये-जा सुरू होती, ज्यामुळे कामाची गुणवत्ता खालावण्याची शक्यता आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, रस्त्यावरचा चिखल आणि पाणी न काढताच त्यावर काँक्रीट टाकले जात होते. अशा प्रकारे केलेले काम किती काळ टिकेल, याबाबत जनतेत संशय व्यक्त होत आहे.
हालचाल नोंदवही कोरी, पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
या संदर्भात माहिती घेण्यासाठी जेव्हा कुडाळ कार्यालयात संपर्क साधण्यात आला, तेव्हा संबंधित अधिकारी 'साइटवर गेले आहेत' असे सांगण्यात आले. मात्र, ते नेमक्या कोणत्या साइटवर गेले आहेत, याची कोणतीही नोंद कार्यालयात नव्हती. कार्यालयाची हालचाल नोंदवही तपासली असता, २०२४ पासून त्यात कोणतीही नोंद केली नसल्याचे आढळले. यामुळे, 'या विभागाने गेल्या दीड वर्षात कोणतेच काम केले नाही का?' असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हालचाल नोंदवही ही शासकीय कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची नोंद घेण्यासाठी आणि कामात पारदर्शकता आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. मात्र, कुडाळ PWD मध्ये या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसत आहे. शासकीय अधिकारीच असा मनमानी कारभार करत असतील, तर विकासकामे वेळेवर आणि योग्य दर्जाची कशी पूर्ण होतील, असा संतप्त सवाल जनता विचारत आहे.