
कुडाळ : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्यांदेखत सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब चांगलेच भडकले आहेत. प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत परब यांनी आज मनसे पदाधिकाऱ्यांसह थेट राज्य उत्पादन शुल्क, कुडाळ कार्यालयावर धडक दिली. विशेष म्हणजे, यावेळी त्यांनी गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्यांचा हार निरीक्षकांच्या गळ्यात घालून शासनाच्या ढिसाळ कारभाराचा उपरोधिक निषेध केला.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ तालुक्यात अवैध दारू विक्रीची ठिकाणे आणि त्यामागे कार्यरत असलेल्या यंत्रणांची सविस्तर माहिती उत्पादन शुल्क विभागाला दिली. परब यांनी यावेळी स्पष्ट शब्दात इशारा दिला की, "आम्हाला हलक्यात घेऊ नका. जर येत्या दोन दिवसांत या अवैध दारू अड्ड्यांवर कारवाई झाली नाही, तर त्याचे गंभीर परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील." राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई न केल्यास मनसे अधिक तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे परब यांनी जाहीर केले. "जर येथे कारवाई झाली नाही, तर आम्ही थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करू," असे परब म्हणाले.
यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, तालुका उपाध्यक्ष जगन्नाथ गावडे, गजानन राऊळ, अविनाश अणावकर, विभाग अध्यक्ष प्रथमेश धुरी, शाखा अध्यक्ष अनिकेत ठाकूर, महाराष्ट्र सैनिक सूरज नेरूरकर, विष्णु मसके, वल्लभ जोशी, रोशन ठाकूर आणि अजय जोशी यांसह मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. मनसेच्या या आंदोलनामुळे अवैध दारू विक्रीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.