चोराचं नशीब फुटक.. घर फोडले पण चोराचा प्लॅन फसला

घरातच आढळला सर्व मुद्देमाल
Edited by:
Published on: July 05, 2025 11:45 AM
views 258  views

कुडाळ : माणसाचे नशीब बलवत्तर असेल तर काय होते आणि नशीब बेकार असेल तर धाडसी प्रयत्न देखील कसे व्यर्थ होतात, याचा प्रत्यय पिंगुळीतील एका चोरीच्या घटनेमुळे सर्वाना आला. पिंगुळी-राऊळवाडी येथील रस्त्याला लागून असलेले परुळेकर कुटुंबीयांचे घर गुरुवारी 3 जुलै रोजी भर दिवसा चोरट्याने फोडले. परुळेकर यांनी घरी आल्यावर  घरात असलेले  सुमारे 45 तोळे सोन्याचे दागिने व रोख दीड लाख रुपये चोरीस गेल्याची कुडाळ पोलिसात तक्रर सुद्धा दिली. मात्र चोरीचा गुन्हा दाखल करून तपासाची प्राथमिक कामे पूर्ण केल्यावर पोलीस व परुळेकर कुटुंबीयांनी ज्या बेड वजा दिवाणात दागिने व रक्कम ठेवली होती त्यांची झडती घेत शोध घेण्याचा प्रयत्न केला असता सर्व मुद्देमाल बेडच्या शेवटच्या टोकाला मध्यरात्री उशिरा सापडून आला.  त्यामुळे परुळेकर कुटुंबियांचे नशीब चांगले तर चोरट्याचे नशीब खोटे निघाले. 

 पिंगळी म्हापसेकर तिठा ते राऊळ महाराज मठ ते हायवे या मार्गावर राऊळ महाराज मठाच्या अलीकडे वळणावर २०० मीटर अंतरावर संतोष परुळेकर यांचा बंगला आहे.  गुरुवारी 3 जुलैला सकाळी 9:45 वा ते  सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्याने अज्ञात चोरट्याने बंगल्याच्या मुख्य दरवाजाची कडी कोयंडा कोणत्यातरी हत्याराने उचकटून आणि मोडून काढत मुख्य दरवाजांने  घरात प्रवेश केला आणि कपाटे व बेड विस्कटून चोरीचा प्रयत्न केला.  परुळेकर दांपत्य ओरोस येथे नोकरीला आहेत. फिर्यादी सौ दीपा संतोष परुळेकर (व 51) या जिल्हा सत्र न्यायालयात सहाय्यक अधीक्षक आहेत व त्यांचे पती संतोष परुळेकर  लघुलेखक म्हणून कार्यरत आहेत. 

नेहमीप्रमाणे सकाळी पावणेदहा वाजता ती दोघे ओरोसला जायला निघाली व सायंकाळी सात वाजता घरी आली.  घराचे कुलूप काढायला दीपा यांनी चावी काढून कुलपाला लावायला गेल्यावर त्यांना तेथे कुलूप दिसले नाही.  दरवाज्याचा कडी कोंडा तुटलेला आढळून आला.  घराचे कुलूप जाग्यावर नसल्याने त्यांनी घरात जाऊन पाहिले असता बेडरूम मधील साहित्य अस्ताव्यस्त टाकलेले दिसून आले.  बेडरूम मधील पलंगामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम त्यांना दिसून आले नाही.  त्यामुळे त्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली.. 

आजच्या सोन्याच्या बाजारभावानुसार सुमाळे 50 लाख रुपये किमतीचे सोने व रोख रक्कम चोरीस गेल्याचे समजताच कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि सहकारी पिंगुळी येथील परुळेकर यांच्या घरी पोहोचले.  घराची पाहणी करून तात्काळ तपासाची यंत्रणा हलवण्यात आली. श्वान पथक, ठसे तज्ञ पथक, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग, जिल्हा पोलीस अधीक्षक व सर्व यंत्रणांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस अधिकारी कर्मचारी पिंगुळी व कुडाळात तपासाची चक्री हलवत होते.  घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याचे लक्षात येताच परुळेकर दांपत्याला धक्का बसला होता.  पोलिसांनी त्यांना धीर दिला. 

चोरट्याने घरात प्रवेश केल्यावर बेडरूम मध्ये असलेल्या दोन्ही कपाटातील सर्व साहित्य जिकडे तिकडे  अस्ताव्यस्त फेकले होते.  तसेच कपात व बेडच्या आतील कपडे, चादरी व अन्य साहित्य बाहेर काढून बेडरूम मध्ये अस्ताव्यस्त टाकले होते.  ज्या ठिकाणी दागिने व रोख रक्कम ठेवली होती तेथे सापडली नाही, त्यामुळे सोन्याचे दागिने रोख रक्कम चोरट्याच्या हाती लागून ते चोरीस गेले याची खात्री परुळेकर यांना पटली आणि मग दीपा परुळेकर यांनी पोलिसांना चोरीची खबर दिली.  दीपा परुळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत वीस प्रकारचे सोन्याचे दागिने व दीड लाख रोख रक्कम मिळून एकूण 24 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे म्हटले आहे.  मंगळसूत्र, सोन्याचे लॉकेट, सोन्याच्या चार चैनी, सोन्याच्या बांगड्या, सोन्याच्या दोन पाटल्या, सोन्याची माळ, सोन्याचा हार, सोन्याचे ब्रेसलेट दोन, सोनीचे  कानातले बारा जोड, तीन सोन्याच्या अंगठ्या, दोन लेडीज अंगठ्या, पाच लहान मुलांच्या अंगठ्या, सोन्याची नथ, सोन्याचे 70 ग्राम  वजनाचे 10 कॉइन, एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे चार फेरे असलेला दागिना चोरीस गेल्याचे फिर्यादित म्हटले होते. 

     पोलिसांनी रात्री श्वानपथक आणले. श्वानाला वास दिल्यानंतर ते तेथील मंगल कार्यापर्यंत जाऊन माघारी आले.  तसेच ठसे तज्ञ दाखल झाले.  त्यांनी ठसे घेतले. जिल्हा पोलीस यंत्रणेची सर्व तपास यंत्रणा रात्रीच कामाला लागली होती. पोलीस यंत्रणेने तक्रार घेणे व तपासातील प्राथमिक टप्पा पूर्ण केल्यावर सोन्याचे दागिने व रोख रक्कम कुठे ठेवली होती ते पुन्हा एकदा तपासण्याबाबत निर्णय घेतला.  त्यावेळी पलंगाच्या आत मध्ये शेवटी कोपऱ्यात स्टीलचा डबा रोख रक्कम कपड्याच्या खाली सापडून आली आणि परुळेकर दंपत्यासह पोलिसांनी सुटकेचा विश्वास सोडला. सर्व मुद्देमाल असल्याची खात्री करण्यात आली.  

चोरट्याने सुरुवातीला मागील दरवाज्यातून घरात घुसण्याचा प्रयत्न केला.  दरवाजा उघडण्यासाठी कटावणीच्या साह्याने प्रयत्न केला. मागील दरवाजा उघडण्यात यश मिळवले०  आत आल्यावर त्यांनी तेथून जिन्याने माडीवर जाऊन दोन्ही रुमची कुलपे तोडली.  अभ्यास खोलीत जाऊन टेबल मधील पुस्तके साहित्य विस्कटून टाकले.  मात्र तेथे असलेल्या लॅपटॉपला त्यांनी हात लावला नाही.  मागील बाजूने घरात हॉल व बेडरूम कडे येण्याच्या मार्गावर एक मुख्य दरवाजा आहे, तो तो आतून कडी लावण्यात आल्याने चोरट्याने तिथून आत येण्याचा केलेला प्रयत्न असफल ठरला.  त्यांच्या खाणाखुणा दिसून येत होत्या.  त्यामुळे अखेर चोरट्याने समोरच्या मुख्य दरवाजाकडे आपला मोर्चा वळवून कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि चोरीचा प्रयत्न केला.  मात्र त्यात यश आले नाही.  मात्र चोरट्याने घरातले कपडे साहित्य सर्व विस्कटून टाकले होते. 

चोरीच्या उद्देशाने घराकडे आल्यापासून त्यांनी किमान दोन तास तरी वेळ दिला.  त्यावेळी पाऊस असल्याने व घरामागील घर बंद असल्याने मागील दरवाजा तोडण्यासाठी जे प्रयत्न केले त्याचा आवाज परिसरात कोणालाच ऐकू आला नसावा.  त्यानंतर माडीवर व घरातही सर्व साहित्य विस्कटून टाकले होते.  सोने व पैशाचाही शोध त्याने घेतला असावा, मात्र परुळेकर कुटुंबीयांचे नशीब चांगले असल्याने दागिने व पैसे त्यांच्या हाती लागू शकले नव्हते.  रात्री घटनास्थळी डीवायएसपी विनोद कांबळी, कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्री कोल्हे उपनिरीक्षक श्री हाडके, सुरेश राठोड व अन्य अधिकारी कर्मचारी उशिरापर्यंत होते एस बी कदम प्रमोद काळजेकर कृष्णा केसरकर मंगेश शिंगाडे नंदकुमार चिंदरकर महेश दळवी व अन्य पोलीस कर्मचारी तपास कामात सक्रिय होते. 

 सर्व मुद्देमाल  सापडला असला तरी चोरट्याच्या शोधासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे. घरातील किरकोळ   रक्कम तसेच चांदीच्या वस्तू चोरट्याने लंपास केल्या असतील तर त्याचा शोध पोलीस घेणार आहेत.  पिंगुळी राऊळ महाराज मठातील चोरी प्रकरणातील चोर अद्याप सापडले नसून तेथूनच 200 मीटर अंतरावर या मोठ्या चोरीचा प्रकार चोरट्याने केला होता.  मात्र त्यात यश आले नसले तरी चोरट्यांना शोधण्याचे आव्हान कुडाळ  पोलिसांसमोर आहे.