खो खो राज्य स्तरीय पंच परीक्षेचं उद्घाटन

जिल्हा खो खो असोसिएशन अध्यक्ष अमित सामंत यांची प्रमुख उपस्थिती
Edited by:
Published on: June 29, 2025 13:42 PM
views 124  views

कुडाळ : खो खो विश्वचषक स्पर्धा आयोजीत केली, त्याचबरोबर देशपातळीवर होणारी खो खो लिग स्पर्धा देखील लोकप्रिय होत आहे. अशावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात अगदी तळागाळात खो-खो खेळ वाढवण्याची जबाबदारी आता आपणा सर्वांची आहे. मी तुमच्या सोबतच आहे. हे शिवधनुष्य आपण सर्वांच्या सोबतीने समर्थपणे पेलू असा मला विश्वास वाटतो. असे  प्रतिपादन दिअमॅच्युअर खो-खो असोसिएशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष अमित सामंत यांनी व्यक्त केले. कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय खो-खो पंच परीक्षेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खो-खोचा प्रचार, प्रसार आणि विकास करण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर दिली आहे. हे करण्यासाठी आपण सर्वांनी मैदानात उतरले पाहिजे.जेथे जेथे गरज लागेल तेथे मी तुमच्यासोबत आहे असे अमित सामंत यांनी सांगितले. आज शनिवार दिनांक २८ जून रोजी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था येथे परीक्षार्थीसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अमित सामंत यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात खो खोची लोकप्रियता वाढविण्यासाठी येत्या डिसेंबर - जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय खो खो स्पर्धा आयोजित करणार असल्याचेही अमित सामंत यांनी सांगितले. यावेळी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी या राज्य स्पर्धेसाठी आमचे शैक्षणिक संकुल सदैव्य तयार असल्याचे सांगितले. मोबाईलच्या जमान्यात मुले आणि तरुण पिढी मैदानापासून दुरावत आहे. त्यांना परत मैदानावर आणण्यासाठी क्रीडा चळवळ राबविणे आवश्यक आहे. यासाठी खो खो सारख्या पारंपारिक खेळाला पर्याय  नाही, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्यावतीने रविवार दिनांक २९ जून रोजी राज्यस्तरीय खोखो पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे केंद्र ठेवण्यात आले आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून २७ खो-खो प्रेमींनी या राज्य पंच परीक्षेला प्रतिसाद दिला.  यावेळी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे माजी सरचिटणीस संदीप तावडे, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे तांत्रिक समिती सदस्य कृष्णा करंजळकर, जिल्हा संघटनेचे सचिव संजय पेंडूरकर, उपाध्यक्ष श्रीनाथ फणसेकर, खजिनदार दुर्वांक मेस्त्री, मंदार गोसावी, क्रिस्टन रॉड्रिक्स, तेजस्वी नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. दिनांक २० एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्यावतीने जिल्हा खो खो पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पंचांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. जिल्हा पंच परीक्षेत संपूर्ण जिल्ह्यातून २९ परीक्षार्थी सहभागी झाले होते. जिल्ह्याचा १०० टक्के निकाल लागला.

रविवार दिनांक २९ जून रोजी सकाळी ८.०० वाजल्यापासून लेखी, तोंडी आणि प्रात्यक्षिक स्वरूपात राज्य पंच परीक्षा होणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या पंचांना ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय पंच शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र खो खो संघटनेच्या नियमानुसार दरवर्षी होणाऱ्या पंच शिबिरात सहभागी होणाऱ्या पंचांना वर्षभर होणाऱ्या राज्य स्पर्धेत पंच म्हणून काम करण्याची संधी दिली जाते.