गटार तुंबल्यानेच रस्त्याला नदीचे स्वरूप

माणगावात दरवर्षी रस्त्यावर पाणी | सार्वजनिक बांधकाम, ग्रामपंचायतीची डोळेझाक
Edited by:
Published on: May 29, 2025 17:28 PM
views 226  views

कुडाळ : माणगाव तिठा ते माणगाव सोसायटीकडील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या भागात दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचून नागरिक तसेच प्रवाशांची पुरती तारांबळ उडते. या भागात गटारीचे व्यवस्थापन नसल्याने गटारातील पाणी पूर्णतः रस्त्यावर येऊन रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त होते. सार्वजनिक बांधकाम तसेच ग्रामपंचायत मात्र याकडे कानाडोळा करीत आपले याच्याशी काहीही घेणे-देणे नाही याच आविर्भावात वावरत आहे. याचे परिणाम मात्र नागरिकांना, बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना भोगावे लागत आहेत. मान्सूनपूर्वची काहीच कामे संबंधितांकडून होत नसल्याने पावसाळ्यात सर्वांचीच तारांबळ उडते.

माणगाव तिठा तर जलमयच होतो. तिठ्यावर मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गटारांचा पत्ताच नसल्याने मोठा पाऊस पडल्यास रस्त्यावर पाणी येऊन तळ्याचे स्वरुप प्राप्त होते. तिठ्यावरील दोन्ही बाजूकडील दुकानदारांनी गटारी पूर्णपणे बुजवून त्यावर आपल्या दुकानाचा पुढील भाग थाटला आहे. त्यामुळे मुसळधार पावसात रस्त्यावरील पाणी आणि दुकानांच्या पाठीमागील पाणी पूर्णतः रस्त्यावर येऊन नदीचे स्वरुप प्राप्त होते. याकडे ग्रामपंचायत मात्र कानाडोळा करीत असून पाणी साचल्यावर सर्वांचीच धावाधाव होते. 

माणगाव तिठाच्या पुढील बाजाराकडे जाताना जुनी देना बँक परिसरात हीच स्थिती आहे. येथेही पाणी रस्त्यावरून येऊन नागरिकांची तारांबळ उडते. तसेच पुढे चर्च गेट जवळ गटारी तुंबल्याने रस्त्यावर पाणी येते. पुढे नानचे एसटी बसथांब्याजवळही हीच स्थिती पाहायला मिळते. येथे तर गटारामध्ये प्लास्टिक बाटल्यांचा खच साचल्याने पाणी पुढे सरकत नाही. येथे मुसळधार पावसात गटारातील पाणी रस्त्यावर येते. 

मळावाडीतही गटार स्वच्छ न केल्यामुळे पाणी साचून राहत असल्यामुळे ते पाणी रस्त्यावर येते. रस्त्यावर चालकांना गाड्या चालविताना मोठी कसरत करावी लागते. एक तर गाड्या हळू चालवाव्यात लागतात.  या रस्त्यावर काही ठिकाणी तर गुडघाभर पाणी साचल्याने गाड्या चालविताना चालकाला मोठ्या कसरतीने त्या पाण्यातून बाहेर काढाव्या लागतात.  पुढे माणगाव सोसायटीच्या अलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ गटारी स्वच्छ न केल्यामुळे रस्त्यावर पाणी येते. 

मान्सूनपूर्व कामांकडे ग्रामपंचायत लक्षच देत नसल्याने याचे परिणाम सर्वसामान्यांना भोगावे लागत आहेत. मान्सूनपूर्व कामात गटार केव्हाच स्वच्छ केलेले दिसत नाहीत. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडी वाढल्याने या झाडीमध्ये गटारीतून वाहत आलेला कचरा साचल्यामुळे पाणी पुढे सरकत नाही. त्यामुळे रस्त्यावर पाणी येते. ग्रामपंचायतीने किंवा रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरमालकांनी ही रस्त्यावर पाणी साचण्याची कारणे शोधावीत व प्रवाशांना सोयीस्कर होईल, पाण्याचा निचरा कसा योग्य होईल, याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासी तसेच वाहनधारकांकडून केली जात आहे.

नेमेचि येतो मग पावसाळा

दरवर्षी जोराचा पाऊस सुरू झाला की, माणगाव तिठ्यावर पाणी साचते. एव्हाना शिवाजी पुतळ्यापर्यंत मध्ये मध्ये गुडघाभर पाणी रस्त्यावर   आलेले असते. पाण्यातून कशा गाड्यात जातात, कोणाची कशी फजिती होते. हे येथील बघे (ग्रामस्थ) उघड्या डोळ्यांनी पाहत असतात. मात्र, या रस्त्यावर पाणी येण्याची कारणे  किंवा त्याचा निचरा करण्याचा कोणच विचार करीत नाही. यात मात्र सामान्य प्रवास करणारे नागरिक वा वाहनचालकांची मोठी तारांबळ उडते. याचा विचार झाला पाहिजे व त्यावर योग्य ती उपाययोजना केली पाहिजे.