
सिंधुदुर्गनगरी : गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेली कुडाळ ते कर्ली जाणारी एस टी बस सोमवार पासून पुन्हा सुरू झाल्याने विद्यार्थी तसेच ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे. कुडाळ आगारातून सायं चार वाजून वीस मिनिटांनी सुटणारी कुडाळ – कोरजाई व्हाया कर्ली बसफेरी गेली कित्येक दिवस बंद होती. त्यामुळे परुळे हायस्कूल येथून शाळा सुटल्यावर घरी जाणा-या शाळकरी मुलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण होत होती. खासगी वाहनातून प्रवास करावा लागत असल्याने त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता.
तसेच गावातून मुंबई येथे जाणा-या रेल्वेच्या प्रवाशांची देखील मोठी गैरसोय होत होती. आज पासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची लालपरी पुन्हा एकदा धावू लागल्याने ग्रामस्थांची व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दुर झालेली आहे. त्यामुळे कर्ली, कोरजाई ग्रामस्थ व चाकरमान्यांकडून राज्य परिवहन महामंडळ कुडाळ आगाराचे, ग्रामपंचायत परुळे बाजारचे व गाडी सुरु करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी विशेष प्रयत्न केले त्या सर्वांचे आभार मानण्यात येत आहेत.