कुडाळ न.पं. च्या सभेत कुत्रे निर्बिजीकरण मोहिमेचा मुद्दा गाजला

Edited by: रोहन नाईक
Published on: July 03, 2023 16:01 PM
views 105  views

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीची सभा आज, सोमवारी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत विविध विकासकामांचे ठराव मंजूर करण्यात आले. ही सभा नगराध्यक्षा अक्षता खटावकर यांच्या अध्यक्षतेखाली न. पं. कार्यालय येथे झाली. यावेळी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, मुख्याधिकारी अरविंद नातू, नगरसेवक यांच्यासह खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते.

     शहरातील भटके कुत्रे निर्बिजीकरण मोहिमेचा ज्या संस्थेला ठेका देण्यात आला, त्याच संस्थेचे रजिस्ट्रेशन रद्द झाले असताना त्यांना ठेका कसा काय देण्यात आला? याबाबतचे सर्व आवश्यक कागदपत्रे न. पं. प्रशासनाकडे आम्ही सादर केली असून कोणती कारवाई करण्यात येणार आहे?असा प्रश्न नगरसेवक विलास कुडाळकर यांनी उपस्थित केला. त्यावर मुख्याधिकारी नातू यांनी त्या संस्थेची सातारा येथे नोंदणी झाली आहे तेथे पत्रव्यवहार करण्यात आला असून याबाबत उत्तर आल्यावर हा विषय सभेत ठेवून पुढील कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले.

     नगरपंचायत हद्दीत कुठेही बॅनर्स तसेच होर्डिग्ज लावावयाचे असल्यास त्यासाठी संबंधितांना न.पं.ची परवानगी घेऊनच ते बॅनर लावावे लागणार आहेत. अन्यथा परवानगी न घेता होर्डिग्ज अथवा फलक लावल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी नातू यांनी यावेळी दिली. त्यावर शहरात होर्डिग्ज व फलक लावण्यासाठी जागा निश्चिती करण्यासाठी सर्व्हे करण्याचे ठरविण्यात आले.

     शहरातील भंगसाळ नदी किनारील मुख्य गणेश घाट सुशोभीकरणाला मंजुरी देण्यात आली.  वेंगुर्लेकरवाडी आणि वरची कुंभारवाडी येथील कोकण रेल्वे प्रकल्प ग्रस्तांना पाणी बिलात ग्रा. पं.कार्यकालानुसार सवलत मिळावी यासाठी उपविधी तयार करण्याचे ठरविण्यात आले. न. पं.च्या ताब्यातील जुनी ग्रामपंचायत इमारत, मच्छीमार्केट व नारळ मार्केट इमारत या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले असून या धोकादायक इमारती पाडण्याची कार्यवाही करण्याचे ठरविण्यात आले.  कुडाळ भंगसाळ नदीकिनारील स्मशानभूमी येथे शेड बांधकाम आणि विद्युत दिवे बसविणे या कामासाठी आ. सुनील शिंदे यांच्या माध्यमातून २० लाख रुपये निधी मंजूर झाला असून हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरसेवक उदय मांजरेकर यांनी आ. शिंदे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. विविध विषयांवरील चर्चेत सर्वच उपस्थित नगरसेवकांनी सहभाग घेतला.