कुडाळमध्ये उद्या एकाच दिवसात ९ कामांचे लोकार्पण व भूमिपूजन

आमदार निलेश राणेंच्या माध्यामतून कोट्यावधींचा निधी
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: May 12, 2026 16:38 PM
views 222  views

कुडाळ : कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यात विकासकामांचा धडाका सुरू असून, बुधवार दि. १३ मे २०२६ रोजी तालुक्यात विविध विकासकामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालणाऱ्या या झंझावाती दौऱ्यात पाणीपुरवठा, पर्यटन, वीज, दळणवळण आणि शैक्षणिक सुविधा अशा एकूण ९ महत्त्वाच्या कामांचा शुभारंभ आमदार राणे यांच्या हस्ते केला जाणार आहे.

दौऱ्याची सुरुवात सकाळी १० वाजता नेरुर कलेश्वर मंदिर येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या लोकार्पणाने होईल, ज्यामुळे स्थानिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर निसर्गरम्य वालावल आणि पाट तलावाच्या सुशोभीकरण कामांचे भूमिपूजन आमदार राणे यांच्या हस्ते होणार आहे. या कामांमुळे तालुक्याच्या पर्यटन वैभवात भर पडणार आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार राणे यांनी विशेष पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने निवजे-आंबेरी रस्ता आणि कसाल-कुंदे-आंब्रड मार्ग या दोन प्रमुख मार्गावरील नूतन पुलांचे लोकार्पण उद्या होणार आहे. या पुलांमुळे पावसाळ्यात निर्माण होणारी वाहतुकीची कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.

दौऱ्याचे सविस्तर नियोजन असे:

सकाळी १०.००: जलशुद्धीकरण प्रकल्प लोकार्पण (नेरुर कलेश्वर मंदिर).

सकाळी ११.००: तलाव सुशोभीकरण भूमिपूजन (वालावल).

सकाळी ११.३०: नवीन ट्रान्सफॉर्मर लोकार्पण (वालावल).

दुपारी १२.३०: तलाव सुशोभीकरण भूमिपूजन (पाट).

दुपारी ३.००: पुलाचे लोकार्पण (निवजे-आंबेरी रस्ता).

दुपारी ४.००: नदीवर जेटी बांधणे भूमिपूजन (अणाव - पिटढवळ नदी).

सायंकाळी ५.००: पुलाचे लोकार्पण (कुंदे - कसाल-कुंदे-आंब्रड मार्ग).

सायंकाळी ५.३०: बंधारा बांधणे भूमिपूजन (पोखरण सांद्रेवाडी).

सायंकाळी ६.००: प्राथमिक शाळा सभामंडप लोकार्पण (आंब्रड परबवाडी).

आमदार निलेश राणे यांच्या या विकास दौऱ्यामुळे कुडाळ तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या सर्व कार्यक्रमांना महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.