
कुडाळ : बऱ्याचवेळा ग्राहकांची दिशाभूल करण्याचे काम विक्रेते, सेवा देणाऱ्या संस्था तसेच प्रशासन करते. त्यासाठी ग्राहकाला आपले हक्क आणि कर्तव्ये माहीत असणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा कार्यशाळा उपयोगी ठरतात. त्यामुळे ग्राहक सजग होतो. असे प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्य सचिव अरुण वाघमारे यांनी केले. ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा शाखा आणि कुडाळ तालुका शाखा यांच्या विद्यमाने जिल्हास्तरीय एकदिवशीय ग्राहक कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळा 2026 चे आयोजन येथील मराठा समाज सभागृहात करण्यात आले होते. त्याच्या उदघाटन सत्रावेळी श्री. वाघमारे बोलत होते.
या कार्यशाळेचे उदघाटन जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि प्रतिमा पूजन करून झाले. ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्य सचिव अरुण वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उदघाटन सत्रावेळी व्यासपीठावर जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे संघटक सर्जेराव जाधव, कोशाध्यक्ष श्रीमती सुनीता राजेघाटगे, राज्य सहसचिव प्रा. एस.एन. पाटील, महावितरणचे कार्यकारी अभियंता (प्रशासन) योगेंद्र वाघ, जिल्हा संघटक विष्णुप्रसाद दळवी, कुडाळ तालुका अध्यक्ष प्रदीप शिंदे, सचिव प्रा. अजित कानशिडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना अरुण वाघमारे म्हणाले, ग्राहकाने प्रत्येकवेळी सजग असणे आवश्यक आहे. ग्राहक संरक्षण कायद्याने ग्राहकाला संरक्षण दिले आहे त्याचा फायदा घेतला पाहिजे. वेळप्रसंगी आपले हक्क जाणून प्रशासनाला जाब विचारला पाहिजे. वस्तू खरेदी करताना त्याचे बिल घेतले पाहिजे असे आवाहन अरुण वाघमारे यांनी केले.
उदघाटक विजय सहारे म्हणाले, नकली वस्तू, फसवणूक यापासून ग्राहकाने सावधगिरी बाळगली पाहिजे. जागरूक राहिले पाहिजे. ग्राहकाने आपले अधिकार जपले पाहिजेत असे आवाहन श्री. सहारे यांनी केले. महावितरणचे कार्यकारी अभियंता योगेंद्र वाघ म्हणाले, ग्राहक हा राजा आहे. त्यांना चांगली सेवा देण्याचे काम महावितरण करत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहक प्रामाणिक आहे. येथे वीजचोरी नाही. ग्राहक आणि महावीतरण यांनी सकारात्मक वातावरण तयार करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
दुसऱ्या सत्रात शेतकरी ग्राहक प्रबोधन या अंतर्गत सर्जेराव जाधव यांनी फेरफार या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच प्रा. एस.एन.पाटील यांनी ग्राहक पंचायतीची रचना व कार्यपद्धती या विषयावर, श्रीमती वफा खान यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यावर, सौ. श्रद्धा कदम यांनी सजग विद्यार्थी ग्राहक अभियान आणि सुनीता राजेघाटगे यांनी संस्था निधी संकलन व विनियोग या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच यावेळी पोलीस सायबर शाखेच्या धनश्री परब यांनी सायबर क्राइम बाबत मार्गदर्शन केले.
यावेळी प्रश्नोत्तर सत्राचे देखील आयोजन करण्यात आले होते. तसेच कार्यकर्त्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
मान्यवरांचे स्वागत प्रा. एस. एन. पाटील, प्रदीप शिंदे, विष्णुप्रसाद दळवी आणि सुगंधा देवरुखकर यांनी केले. प्रास्ताविक प्रा. अजित कानशीडे यांनी केले. सुत्रसंचलन प्रसिद्धी प्रमुख निलेश जोशी यांनी तर आभार प्रदर्शन प्रदीप शिंदे यांनी केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे पदाधिकारी अवधूत शिरसाट आणि राजन नाईक यांनी या कार्यशाळेला आवर्जून भेट दिली. श्री. शिरसाट आणि श्री. नाईक यांनी यावेळी कार्यशाळेला आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष सुगंधा देवरुखकर, सहसंघटक प्रमोद मोहिते, सहसंघटक महिला श्रीमती रीमा भोसले, सहसचिव विजय कदम, सल्लागार ऍड. समीर वंजारे, कुडाळ सल्लागार आनंद मेस्त्री, कुडाळ प्रसिद्धी प्रमुख निलेश जोशी, वैभववाडी तालुका अध्यक्ष श्रद्धा कदम, देवगडचे नारायण माने, मालवणचे श्रीकांत वेंगुर्लेकर, सिंधुदुर्गनगरीचे श्रीराम चव्हाण आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्राहक उपस्थित होते.










