
कणकवली : तोंडवली - बोभाटेवाडी ग्रामस्थांनी क्रशरबाबत बुधवारी सुरू केलेल्या उपोषणास रात्री कणकवली तहसीलदार दिक्षांत देशपांडे यानी भेट दिली. ग्रामस्थांनी ईटीएस मशीनद्वारे खोदाईचे मोजमाप, घरांची नुकसान भरपाई, क्रशर बंद करणे या मागण्या लावून धरल्या. मात्र तहसीलदार यांनी आपल्या हातात हे नसल्याचे सांगत आपले म्हणणे मी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवतो, असे सांगून उपोषण सोडण्याचे आवाहन केले. मात्र मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यामुळे गुरूवारीही दुस-या उशिरापर्यंत उपोषण सुरुच होते. बुधवारी रात्री तहसीलदार दिक्षांत देशपांडेसह, पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांनी भेट घेऊन ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळेस ग्रामस्थांनी घरांना तडे, क्रशर बंद करणे, ईटीएस मोजणी अशा अनेक विषयांवर तहसीलदार यांच्याशी चर्चा करून या क्रशरमुळे संतोष मोरये, सूर्यकांत सदडेकर याच्यासह अनेक घर पडायला गेले. मात्र आजही प्रशासनातर्फे पाहणी केली नाही. त्याचबरोबर आजपर्यंत पाच गुरे मेली असून अनेक शेती व काजू बागा नुकसान झाले आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित केले.
येथील घरे ५०० मीटरच्या आत असताना ती बाहेर दाखवून परवानगी मिळवली असून क्रशर बंद करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यावर तहसीलदार यांनी आपला पूर्वीचा अहवाल जिल्हाधिकारी याना पाठवणार असून आता आपली मागणी असलेली ईटीएस मोजणी,नुकसान भरपाई, क्रशर बंद करणे याबाबत आपल्याकडे अधिकार नसून आपण याबाबत जिल्हाधिकारी यांची भेट घ्या किंवा आपल्या सर्व मागण्या आपण जिल्हाधिकारी यांना पाठवतो. आपण उपोषण मागे घ्या, अशी विनंती केली. मात्र, ग्रामस्थांनी एकमुखाने मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. या दरम्यान रात्रीच तहसीलदार, पोलीस निरीक्षक, मंडल अधिकारी, तलाठी व ग्रामस्थ यांनी बाधीत घराची पाहणी केली. या उपोषणास कणकवली सभापती हर्षदा वाळके, जि.प.सदस्य संतोष पारकर, माजी जि.प.सदस्य संजय देसाई, कलाकार मानधन समिती अध्यक्ष संतोष कानडे यांनी भेट दिली.










