
कुडाळ : साहेबांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी सणच असतो. आमच्या कुटुंबासोबतच कार्यकर्ते देखील हा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात, हे आमच्यासाठी केवळ प्रोत्साहन नसून एक मोठी जबाबदारी आहे," असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी केले.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये आंतरराज्यस्तरीय कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आमदार निलेश राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या स्पर्धांचे शानदार उद्घाटन झाले.
यावेळी बोलताना निलेश राणे पुढे म्हणाले की, "भाजप असो वा शिवसेना, यामधील सर्व कार्यकर्ते हे आमच्या कुटुंबातीलच घटक आहेत. साहेबांचा वाढदिवस सर्वांसाठी एका उत्सवासारखा असतो. आम्हा कुटुंबीयांना हा दिवस अत्यंत महत्त्वाचा वाटतोच, पण ज्या उत्साहात कार्यकर्ते जिल्हाभर विविध उपक्रम राबवत आहेत, ते पाहून साहेबांनी कमावलेल्या प्रेमाची प्रचिती येते. आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे."
या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, महिला संघटक संध्या तेरसे, सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सिताराम तेली, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, राजू राऊळ, तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर, नागेश आईर, आरती पाटील, रुपेश कानडे, भाई सावंत, छोटू पारकर, कॅरम असोसिएशनचे ॲड. सुधीर भणगे, सुनील धुरी, बंड्या सावंत आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पप्या तवटे यांनी केले. या स्पर्धेच्या निमित्ताने जिल्हाभरातील क्रीडाप्रेमींनी कुडाळमध्ये मोठी गर्दी केली होती.









