झाराप सरपंचांवरील अविश्वास ठराव बहुमताने मंजूर

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: April 10, 2026 19:49 PM
views 121  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील झाराप ग्रामपंचायतीच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ झाली. सरपंच दक्षता मेस्त्री यांच्या विरोधात सदस्यांनी मांडलेला अविश्वास ठराव आज झालेल्या विशेष बैठकीत मंजूर करण्यात आला.  तब्बल ८ सदस्यांनी सरपंचांविरुद्ध भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात ही चर्चेची बाब ठरली आहे. स्वच्छ व हरित ग्रामपंचायत मोहिमेत झाराप ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत राष्ट्रीय स्तरावरही मानांकन मिळवले आहे. विकासकामांत राज्यात आदर्श ठरलेल्या ग्रामपंचायतीतच असा अंतर्गत वाद उफाळून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, हा ठराव केवळ वैयक्तिक आकसापोटी आणि सूडाच्या भावनेतून आणल्याचा आरोप सरपंच समर्थकांकडून करण्यात येत आहे.

ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेश गावकर यांच्यासह अशपाक कुडाळकर, विजय हरमलकर, तनया मांजरेकर, संजीवनी पेंडूरकर, अमृता हरमलकर, विशाखा गोडे आणि प्रियांका रेडकर या आठ सदस्यांनी एकत्र येत कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. आज झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या घडामोडींमुळे झारापमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे आता पुढील कायदेशीर प्रक्रिया तहसीलदारांच्या उपस्थितीत होणाऱ्या सभेत पार पडणार आहे. विकासाच्या वाटेवर असलेल्या या ग्रामपंचायतीचा कारभार आता कोणाच्या हाती जाणार, याबाबत ग्रामस्थांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.