महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न

कुडाळ येथील घटना | महिलेच्या प्रसंगावधानाने चोरट्यांचे पलायन
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: April 10, 2026 19:01 PM
views 49  views

कुडाळ : कुडाळ येथे दोन अज्ञात चोरट्यांकडून  मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न झाला. परंतु महिलेने प्रसंगावधान राखत आरडाओरडा केल्याने चोरट्यांच्या हाती काहीही  लागले नाही. ही घटना बुधवारी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास  घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, रत्नमाला रवी राऊळ (वय - ३१, रा. शुभम शांती रेसिडेन्सी, कुडाळ)  आपल्या लहान मुलासोबत हिंदू कॉलनी येथे आपल्या नातेवाईकांच्या घरी  कार्यक्रमानिमित्त जात होत्या. यावेळी त्या निगुडकर हॉस्पिटलच्या शेजारी आल्या असता दुचाकीवरून २५ ते ३० वयोगटातील दोन इसम आले व त्यांच्या बाजूला दुचाकी थांबवली.  यावेळी दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाने त्यांना "येथे काळे कोठे राहतात ?" असा प्रश्न केला. यावेळी रत्नमाला यांनी मला माहिती नाही असे सांगून त्या आपल्या मुलाला घेऊन पुढे निघून गेल्या. यावेळी त्या मागे बसलेल्या इसमाने मागून येत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करण्याच्या हेतूने हिसकावले.  परंतु रत्नमाला यांनी प्रसंगावधान राखत आपल्या गळ्यातील मंगळसूत्र घट्ट पकडले व आरडाओरडा केला. परंतु सदर इसमाने ते मंगळसूत्र जोरात खेचल्याने ते तुटून रत्नमाला यांच्या हातात आले. तेवढ्यात दुचाकीवरून कोणीतरी येत असल्याची चाहूल लागताच दोन्ही चोरट्यांनी आपल्या दुचाकीवरून पळ काढला. कुडाळ शहरात ऐन दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून सर्वजण भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.