रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा

डॉ. आर. एस. कुलकर्णी यांचे प्रतिपादन
Edited by:
Published on: April 10, 2026 18:49 PM
views 43  views

कुडाळ:  "मानवी सेवेचा खरा मार्ग हा रुग्णसेवेतूनच जातो. मानवाची सेवा करणे म्हणजेच परमेश्वराची सेवा करण्यासारखे आहे. रुग्णसेवा ही केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून, त्या व्यक्तीवर अवलंबून असलेल्या संपूर्ण कुटुंबाची ती सेवा असते. वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान अद्ययावत ठेवून, संवेदनशीलतेने या पेशात काम करावे," असे प्रतिपादन सिंधुदुर्गातील ज्येष्ठ भूलतज्ज्ञ तथा एसएसपीएम (SSPM) रुग्णालय, पडवेचे डीन डॉ. आर. एस. कुलकर्णी यांनी केले.

बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या नर्सिंग व फिजिओथेरपी महाविद्यालयातर्फे आयोजित 'जागतिक आरोग्य दिनाच्या' कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. आपल्या मार्गदर्शनात डॉ. कुलकर्णी पुढे म्हणाले की, "ऍलोपॅथी, होमिओपॅथी आणि आयुर्वेद यांची योग्य सांगड घालून रुग्णांना उपचार द्यावेत. वैद्यकीय क्षेत्राविषयी समाजात अनेक गैरसमज आहेत, ते आपल्या वर्तणुकीतून दूर करा. तारतम्य, तत्परता आणि क्षमता यांचा मेळ घातल्यास आपण अनेक रुग्णांचे प्राण वाचवू शकतो. मानवी शरीर आणि रोगांचे सखोल ज्ञान आत्मसात करून योग्य निदान करण्यावर भर द्या."

यावेळी उपस्थित डॉ. राहुल गवाणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आरोग्याची काळजी घेताना विज्ञानाची कास धरा. रुग्णांशी संवाद साधून त्यांना मानसिक आधार द्या. बॅरिस्टर नाथ पै संस्थेच्या विद्यार्थ्यांनी कोव्हिड काळात केलेली सेवा कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले. संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी डॉ. आर. एस. कुलकर्णी यांचा 'आरोग्य तपस्वी' अशा शब्दांत गौरव केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष यश संपादन करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला:

'फिजिओ आयकॉन अवॉर्ड' (गोवा आंतरराष्ट्रीय फिजिओ काँग्रेस) मिळाल्याबद्दल गौरव. आंतरराष्ट्रीय पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल सत्कार. जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात मूकनाट्य आणि वादविवाद स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नर्सिंग व फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. प्रत्युषरंजन बिस्वाल, उपप्राचार्य वैशाली ओटवणेकर, प्राचार्य अरुण मार्गज, चैताली बांदेकर, पल्लवी कामात, शांभवी आजगावकर-मार्गी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुमन करंगळे-सावंत यांनी केले.