
कुडाळ : कुडाळ शहराच्या मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर आज दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास वेंगुर्ले आगाराची एसटी बस अचानक बंद पडल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. गीता हॉटेलच्या समोरच हा प्रकार घडल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, वेंगुर्ले आगाराची ही बस कुडाळ शहरातून जात असताना अचानक तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. मुख्य रस्ता असल्याने आणि दुपारची वेळ असल्याने काही वेळातच या ठिकाणी वाहनांची मोठी गर्दी झाली. रस्ता अरुंद असल्याने बसच्या बाजूने वाहन काढणे कठीण होऊन बसले होते, परिणामी सुमारे तासभर वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.
घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस श्री. बंडगर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रसंगावधान राखून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, कुडाळ आगाराच्या मेकॅनिकनीही तातडीने घटनास्थळी दाखल होऊन बसच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. साधारण एक तासाच्या प्रयत्नांनंतर बसमधील बिघाड दूर करून ती डेपोत नेण्यात आली. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्ववत झाली. भरवस्तीत बस बंद पडल्याने प्रवाशांचे आणि वाहनधारकांचे काही काळ हाल झाले.











