झाराप इथं महिला दिन उत्साहात

Edited by: संदीप देसाई
Published on: March 09, 2026 16:28 PM
views 26  views

कुडाळ :  “महिला या केवळ कुटुंबाची अर्धांगिनी नसून त्या समाज आणि गावाच्या प्रगतीच्या खऱ्या भाग्यविधाता आहेत. महिलांनी एकत्र येऊन गावाच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासात सक्रिय भूमिका घ्यावी,” असे आवाहन झाराप ग्रामपंचायतीच्या सरपंच दक्षता मेस्त्री यांनी केले. त्या झाराप ग्रामपंचायत सभागृहात आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी झाराप ग्रामपंचायतीत महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

या कार्यक्रमाला जि. प. सदस्य रुपेश कानडे, पंचायत समिती सदस्य जिजा तेली, उपसरपंच मंगेश गावकर, ग्रामपंचायत सदस्य आशपाक कुडाळकर, तनया मांजरेकर, संजीवनी पेंडूरकर, अमृता हरमलकर, विशाखा गोडे, माजी सरपंच प्रभाकर मेस्त्री, ग्रामसेवक सतीश साळगावकर, गंगाराम वेंगुर्लेकर, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. प्रसाद ओगले, भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, मंडळ कृषी अधिकारी गायत्री तेली, उपकृषी अधिकारी मंदार सरंबळकर, कृषी सहाय्यक जागृती शेट्ये कुरतडकर, आत्मा समितीचे अध्यक्ष व पंचायत समिती सदस्य मंगेश प्रभू (तेडोली), आत्मा सदस्य शंकर हरमलकर, मंडळ अधिकारी उत्तरा जांभवडेकर, तलाठी सुषमा गायकवाड, पोलीस पाटील शमिका हरमलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मंडळ अधिकारी उत्तरा जांभवडेकर, तलाठी सुषमा गायकवाड, कृषी सहाय्यक जागृती शेट्ये, पोलीस पाटील शमिका हरमलकर, कोतवाल पूर्णिमा कुडाळकर, पत्रकार वैशाली खानोलकर तसेच गावातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेविका, उद्योजिका, भाजी विक्रेती, व्यवसायिक आणि शेतकरी महिलांचा सरपंच दक्षता मेस्त्री यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात बोलताना जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे यांनी सांगितले की, महिला दिन हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून महिलांच्या हक्क, सन्मान आणि सशक्तीकरणाचा संदेश देणारा दिवस आहे. महिलांचा समाजाच्या प्रत्येक क्षेत्रातील सहभाग आणि योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. पंचायत समिती सदस्य सीताराम तेली यांनीही उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक सतीश साळगावकर यांनी केले, तर आभार  गंगाराम वेंगुर्लेकर यांनी मानले.