आंबा - काजू बागायतदारांच्या मोर्चात सर्व घटकांनी सहभागी

आप्पा चव्हाण यांचं आवाहन
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: March 09, 2026 18:09 PM
views 18  views

मालवण : गुरुवारी १२ मार्चला होणाऱ्या आंबा- काजू बागायतदार आणि व्यावसायिक, व्यापारी यांच्या संयुक्त मोर्चाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या सर्व व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व्यावसायिक सहकारी संघ मर्यादित सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने वायरी येथील आंबा व्यावसायिक तथा संघाचे संचालक आप्पा चव्हाण यानी केले आहे.

चव्हाण यांनी म्हटले आहे, हे आंदोलन सरकारच्या विरोधात नसुन आंबा, काजू या व्यावसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या सर्वप्रकारच्या कुटुंबावर ओढवलेली नैसर्गिक आपत्ती आहे. त्यावर मायबाप महाराष्ट्र शासनाकडून त्यांना जीवदान देण्याऐवजी चाललेला  पुर्णपणे दुर्लक्ष, चेष्टा यावर त्यांचे लक्ष वेधण्यासाठी, या व्यावसायांवर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांना वाऱ्यावर सोडून, हा आम्हा सिंधुदुर्ग वासिय शेतकरी बांधवांना केवळ हिरव्या -भगव्यावर राजनिती करून भावनिक आवाहना पलिकडे न बघता, गरज नसणारे काही मुद्यांवर अधिवेशनात जनतेच्या पैशातूनच मौजमजा होतांना दिसते. आमचा सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्राच्या बाहेर आहे. असाच अर्थ काढला जात आहे. काही सर्वपक्षीय आमदार यावर चर्चा करण्यासाठी बोलत असताना त्यांना रोखून काही वेळा वेळ मारून नेण्याचा सभापतींकडुन प्रकार घडतो. तर काही जबाबदार नेत्यांकडून आंदोलनाचा फेरविचार करण्याचा सल्ला देण्यात येतो. सबुरीचा प्रयत्न चालू आहे. तो पण आम्हा व्यावसायिकांना दुर्लक्षित करण्यासारखा असा आहे. अशा रितीने शासनकर्त्यांची मनमानी, हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी "आर या पार ची "रस्त्यावरची लढाई आता लढावीच लागेल. कारण सरकारचे निर्णय हे जनतेच्या कल्याणासाठी, जीवन जागण्यासाठी असणे गरजेचे आहे. परंतू सरकारला कृषी खात्याकडून ९० %आंबा उत्पादन घटलेले आहे, असा अहवाल प्राप्त होऊनही शासनकर्ते "मांजर बनून मडक्यात डोकं घालून दुध पिण्यासारख" वागत आहेत. हे हम करे सो कायदा"चालणार नाही. तुम्हाला काही ना काही या मोर्चाचे  अतिविराट स्वरूप पाहुण निर्णय घ्यावाच लागेल. एरव्ही काही झालं  की कुणाचीही फिकीर न करणारे, आवाज उठविणारे काही लोकप्रिय नेते आज शांत का ? हे लक्षात येत नाही. राजू शेट्टी हे एक केवळ राज्यातच नव्हे तर देशात, परदेशात शेतकऱ्यांचा बुलंद आवाज उठविणारे नेते, सत्तेच्या लालसेपोटी किंवा त्यातील महत्त्वाच्या पदांसाठी, मंत्रीपदांसाठी त्यांनी आतापर्यंत कधीही शेतकऱ्यांचे हित सोडून  तडजोड केलेली नाही. शेतकरी, कष्टकऱ्यांचे एक निर्भिड नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. केवळ आपला माणुस उपाशी मरतोय हे पाहुण आपली पदं शाबुत राखण्यासाठी तडजोड करत नसतात. हि त्यांची ओळख असल्यांनेच हे आंदोलन त्या़ंच्याच नेतृत्वाखाली होणार. असा एकमुखी निर्णय झालेला आहे. त्यावर जिल्ह्यातील कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी गैरसमज करून घेऊ नये. आणि खरोखरच खंत वाटत असेल तर या आंदोलनात आमच्या खांद्याला खांदा लावून उतरण्याची तयारी ठेवा. आम्ही सर्वांचे स्वागतच करू. त्या दृष्टीने सर्वपक्षाच्या स्थानिक पदाधिकारी, नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. आता उद्या कोण येतात आणि कोण दांडी मारतात, सबबी पुढे करतात ते उद्या समजणारच. पण हा आवाज आता घुमणारच एवढी तयारी झालेली आहे. सर्वसामान्य आंबा बागायतदार आणि कराराने आंबा बागा घेवुन व्यवसाय करणारा दुसरा घटक व्यावसायिकही  फक्त सरकारच मागणीनुसार निधींची तात्काळ तरतूद करून थांबवू शकते. फुकाचे सल्ले देवून, शांततेत चाललेले आंदोलन पोलीसांकरवी मुस्कटदाबी करून थांबवू शकत नाही. तसे झाल्यास मात्र होणाऱ्या परिणामांस शासनकर्तेच जबाबदार रहातील. असा इशारा आप्पा चव्हाण यांनी दिला आहे.