आंबा बागायतदारांसाठी मुख्यमंत्रासमोर संताप व्यक्त करा

उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांचं पालकमंत्री नितेश राणेंना टोला
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: March 09, 2026 17:55 PM
views 25  views

कणकवली : हवामानाच्या अस्मानी संकटामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू बागायदार संकटात सापडला आहे. नुकसानग्रस्त बागायतदारांनी भरपाई मिळावी यासाठी शासन दरबारी पाठपुरवठा केला. मात्र, नुकसान भरपाई देण्यास सरकार टाळाटाळ करीत असल्याने बागायतदार गुरुवार १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. या मोचार्ला आमचा पाठिंबा आहे. बागायतदारांचा हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न पालकमंत्री नितेश राणे हे करीत आहेत. नुकसानग्रस्त बागायतदारांविषयी मंत्री राणे यांना जिव्हाळा असता तर त्यांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर अधिवेशनात संताप व्यक्त करत आवाज उठवला पाहिजे होता,असा टोला शिवसेना उबाठा पक्षाच्या युवा सेनेचे जिल्हाप्रमुख तथा उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी लगावला.

कणकवली नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष दालनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. नाईक बोलत होते. यावेळी नगरसेवक जयेश धुमाळे, तेजस राणे आदी उपस्थित होते. सुशांत नाईक म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू पिकांवर थ्रिप्स रोगाचा प्रादुर्भाव व हवामान बदालाचा परिणाम झाला आहे. त्यामुळे ८० ते ८५ टक्के आंबा, काजूचा मोहर जळून गेला नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने सरकारला दिला आहे. परिणामी बागायतदारांचे नुकसान झाले आहे, हे नुकसान भरून येण्यासाठी किमान दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. आंबा पिकासाठी प्रति हेक्टर ५ लाख तर काजू पिकासाठी प्रति हेक्टर ३ लाख रुपये शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी बागायतदारांची मागणी आहे.

यासाठी त्यांनी वारंवार जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांना निवेदने देऊन शासनाचे लक्ष वेधले. मात्र, शासनाकडून अद्यापाही नुकसान भरपाई देण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त बागायतदार गुरुवार १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी सहभागी होणार आहेत. बायातदार सरकारविरोधात मोर्चा काढत असल्याने पालकमंत्री नितेश राणे यांनी देवगड येथील नुकसानग्रस्त आंबा बागायतींची पाहणी करून सरकार सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु नुकसानग्रस्त बागायतदारांना भरपाई मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अधिवेशनात पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रीपदाचे वजन वापरून याप्रश्नी लक्ष वेधून आर्थिक निधीची तरतूद करणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी ही तरतूद न करून घेता बागायतदारांच्या तोंडाला पाने फुसली आहेत, असा आरोप सुशांत नाईक यांनी केला.  १२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात मोर्चात सिंधुदुर्गवासीयांनी व राजकीय पक्षांच्या नेते,पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राजकीय पादत्राणे बाजूला ठेवून सहभागी व्हावे.

भाड्यासाठी हवामान केंद्र उभारण्यास विरोध 

शासनाने गाव निहाय हवामान केंद्र उभारण्यास ग्रामपंचायत, कृषी विभागाला निर्देश दिले आहेत. ज्या ठिकाणी हवामान केंद्र उभारणार आहे, त्या ठिकाणीचे भाडे जागा मालकाला शासन देणार आहे. हे भाडे सिंधुदुर्ग जिल्ह््यातील सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांना मिळावे यासाठी त्यांचा आपल्या जागेत हवामान केंद्र उभारण्यासाठी अट्टहास असल्याने अन्य ठिकाणी हवामान केंद्रे उभारण्यास हे कार्यकर्ते प्रशासनाला विरोध करीत आहेत, असा  आरोप सुशांत नाईक यांनी केला.