कोकणचा आंबा - काजू बागायतदार संकटात

१२ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: March 09, 2026 17:33 PM
views 61  views

कुडाळ : वातावरणातील बदलांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू पिकाचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणा शेतकरी नेते संजय गावडे यांनी पत्रकार परिषदेत केली. संजय गावडे यांनी सांगितले की, यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यात केवळ ५ ते १० टक्केच उत्पादन हाती आले आहे. कीटकनाशके आणि फवारणीवर मोठा खर्च करूनही पीक हाती न लागल्याने शेतकऱ्यांचा खर्चही वसूल होणे कठीण झाले आहे. याचा फटका केवळ बागायतदारांनाच नाही, तर यावर अवलंबून असलेल्या मजूर वर्गाला आणि स्थानिक प्रक्रिया उद्योगांनाही बसला आहे. कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला आंबा-काजू उद्योग सध्या व्हेंटिलेटरवर असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

बाजारात मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या (बोगस) कीटकनाशकांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप गावडे यांनी केला. "जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी अशा कंपन्यांवर कडक कारवाई करावी. तसेच, नुकसान पाहता कंपन्यांनी औषधांच्या किमतीत शेतकऱ्यांना ५० टक्के सवलत द्यावी," अशी मागणी त्यांनी केली. जिल्ह्यातील सहकारी सोसायट्यांच्या अध्यक्षांवर टीका करताना ते म्हणाले की, जे चेअरमन केवळ निवडणुकीच्या राजकारणासाठी पदे भूषवतात आणि शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करतात, त्यांनी तातडीने राजीनामे द्यावेत. शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवणेही आता पालकांना कठीण झाले असून ही परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले.

राजकीय पाठिंबा आणि आंदोलनाचा इशारा

या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, माजी आमदार वैभव नाईक, संदेश पारकर यांसारख्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचे गावडे यांनी स्पष्ट केले. १२ तारखेला होणाऱ्या या आंदोलनात जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. जोपर्यंत कर्जमाफी आणि ठोस नुकसानभरपाई मिळत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

या पत्रकार परिषदेला संजय गावडे, काका ढोके, किरण टेंभुळकर, गणेश गावकर, प्रशांत तेली, पिंटू गावडे, रतन तेली, पांडुरंग गावडे, विजय सरनोबत आधी अंबा काजू बागायतदार उपस्थित होते.